Join us

‘ती आणि तिचे चार दिवस’ मोहीम अविरत; जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2020 2:25 AM

आदिवासी विभागात जनजागृती

मुंबई : काळाचौकी येथील सुप्रसिद्ध गिर्यारोहक वैभव ऐवळेचा गिर्यारोहण करताना अनेक दुर्लक्षित गावे, खेडी आणि आदिवासी भागांशी संबंध आला. त्या वेळी त्याच्या लक्षात आले की, या भागात आरोग्याविषयी विशेष जागरूकता नाही. विशेषत: महिला-मुलींच्या ‘त्या’ चार दिवसांमध्ये स्वच्छतेची खबरदारी घेतली जात नाही. अशा वेळी सामाजिक भावनेतून गिर्यारोहण मोहिमांबरोबरच वैभवने ‘ती आणि तिचे चार दिवस’ ही मोहीमही हाती घेतली.

डॉ. श्रद्धा भोगले, डॉ. रेश्मा चौरिसया, डॉ. सुनील खत्ते, किरण जाधव, नीलेश माने व तन्मय शिंदे या चमूच्या मदतीने दरवर्षी तो अशा दुर्गम भागांत जाऊन तेथील महिलांमध्ये मासिक पाळीबाबत जनजागृती करून मार्गदर्शन पुस्तिकेचे वाटप करतो. मात्र, या वर्षी कोविड १९च्या प्रादुर्भावामुळे चालू असलेल्या टाळेबंदीमुळे या मोहिमेत खंड पडतो की काय, अशी शक्यता निर्माण झाली असताना वैभवच्या मोहिमेतील चमूने एक चित्रफीत बनवून ती शक्य तेवढ्या भागात पोहोचवून आपली मोहीम अविरत चालू ठेवली आहे. या मोहिमेद्वारे दुर्गम भागातील महिला व मुलींना मासिक पाळी म्हणजे काय, या काळात आपली व्यक्तिगत स्वच्छता कशी राखावी, अस्वच्छतेमुळे होणारे आजार, येणारे वंध्यत्व याची माहिती दिली जाते.

केवळ दुर्गम भागातील महिलांनीच नव्हेतर, प्रत्येक स्त्रीने या काळात आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. मातृत्व ही निसर्गाने स्त्रीला दिलेली अमूल्य देणगी आहे, ज्याचा संबंध या काळातील स्वच्छतेशी असतो. महिलांनी केवळ वर्षातून एकदाच मासिक पाळी स्वच्छता दिन साजरा न करता, तो दर महिन्यात होणाऱ्या मासिक धर्माबरोबर साजरा केला पाहिजे, असे वैभव सांगतो.

टॅग्स :महाराष्ट्र