मुंबई : कांजूरमार्ग सोसायटी तसेच विक्रोळी येथील पालिका शाळेतून दोन लहान मुलांचे अपहरण करून नेल्याच्या व्हायरल ऑडिओ क्लिपने गेल्या काही दिवसांत सोशल मीडियासह सगळीकडे खळबळ उडाली. परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत चौकशीही केली. मात्र, चौकशीत अशा प्रकारची कुठलीही तक्रार करण्यात आली नसल्याचे सांगत पोलीस उपायुक्तांनी ही अफवा असल्याचे सांगितले.
पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांनी दिलेल्या माहितीत, पोलिसांनी ऑडिओ क्लिपमधील माहितीनुसार, संबंधित सोसायटी, शाळेमध्ये भेट दिली. मात्र, तेथे असा कुठलाही प्रकार झाला नसल्याचे सांगितले. तसेच अशी तक्रार प्राप्त झाल्यास तत्काळ कारवाई करण्यात येईल, असेही कदम यांनी नमूद केले. सदरची ऑडिओ क्लिप बनावट असून, नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहनही कदम यांनी केले आहे. त्यापाठोपाठ अंधेरीतील एका इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळेतूनही मुलाचे अपहरण झाल्याच्या ऑडिओ क्लिपमुळे चिंतेत भर टाकली होती. मात्र, चौकशीत ती ऑडिओ क्लिपदेखील खोटी असल्याचे समोर आले आणि सर्वानी सुटकेचा निश्वास टाकला. ही ऑडिओ क्लिप कोणी व्हायरल केली? याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.