Join us

‘ती’ आत्मनिर्भर झाली, की देश आत्मनिर्भर होईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2021 4:07 AM

भारतासारख्या प्राचीन संस्कृती लाभलेल्या देशात अर्वाचीन काळापासून स्त्रीला अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे काही सामाजिक संकेतांतून आढळून येते. हिंदू धर्मात तर ...

भारतासारख्या प्राचीन संस्कृती लाभलेल्या देशात अर्वाचीन काळापासून स्त्रीला अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे काही सामाजिक संकेतांतून आढळून येते. हिंदू धर्मात तर मानवी दिनक्रमाशी आणि उत्कर्षाशी संबंधित अनेक बाबींचे नेतृत्व करणाऱ्या देवतांचे स्वरूप हे स्त्रीरूपातच मांडण्यात आले आहे. सुग्रास जेवण देणारी श्रीअन्नपूर्णा, ज्ञानरूपी खजिना देणारी श्रीसरस्वती, लौकिकार्थाने ऐश्वर्य देणारी श्रीलक्ष्मी वगैरे काही उदाहरणे. प्राचीन भारतात मातृसत्ताक पद्धत असावी आणि पुढे पुरुषांनी ती ताब्यात घेऊन विद्यमान पितृसत्ताक संस्कृती उदयास आली असावी, असाही दावा काही विद्वानांद्वारे केला जातो.

मात्र, मातृसत्ताक पद्धतीने प्रतिबिंत आजही आपल्या समाजात बघायला मिळते. म्हणून तर प्रत्येक सजीवाला आई जवळची वाटते आणि बीजधारणेसह सृष्टीतील सर्व विशेष गुणसंपन्न बाबींना स्त्रीरूपातूनच बघितले जाते. जसे की ‘धरतीपुत्र’ काळ्या मातीला ‘माता’ संबोधतो.

या पार्श्वभूमीवर केवळ महिलांचे सक्षमीकरण, सर्वार्थाने उन्नती, आर्थिक सक्षमीकरण इत्यादी बाबी शहरांची सीमा ओलांडून गावागावात पोहोचत आहेत का, यावर मागील १२५ वर्षांपासून साजऱ्या करण्यात येणाऱ्या महिला दिनाच्या निमित्ताने चिंतन करण्याची वेळ आली आहे.

जगातली स्त्री आता ‘सी स्वीट’साठी म्हणजेच उच्च पदांवर नोकरी करून कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी सिद्ध झाली आहे. अर्थात ‘आपल्याला काहीही सहज-सोपे नाही’ याचे भान स्वत:च्या उदरातून जगाला निर्माण करणाऱ्या स्त्रीमध्ये येणे, हे महिला दिनाचे मोठे यश म्हणावे लागेल. अनंत अडचणींना पोटात घेऊन, पोटासाठी धडपड करत, पोटातूनच नवा जीव निर्माण करणाऱ्या जगातील प्रत्येक महिलेसाठी ‘सी स्वीट’पर्यंतचा प्रवास प्रचंड आव्हानात्मक ठरला.

महिलांचे अधिकार व जागतिक शांततेवर केली जाणारी चर्चा आता अगदी ग्रामीण स्तरावर आली आहे. पुढे जाऊन या चर्चेला शेतीच्या बांधापर्यंत आपल्याला नेता आले, तर महिला विश्वाचे एक वर्तुळ पूर्ण होईल. शेतीचा बांधा ते ‘सी स्वीट’ हा स्त्रियांचा अवघ्या शंभर वर्षातला आश्चर्यजनक प्रवास असून सध्या सर्वच स्तरावर प्रातिनिधिक स्वरूपात कार्य चालू आहे.

प्राचीन काळापासून स्त्रीची मूर्तीत पूजा बांधली गेली, हे खरे असले तरीही आज वास्तवात स्त्रीला बांधावरच बांधण्यात आले आहे. स्त्री समाजाच्या वेगवेगळ्या नियम, अटी, रूढी, परंपरेच्या जोखडात अडकत गेली. पुरुषांचा प्रबल समाज तिला शतकानुशतके आपल्या धारणेसाठी वापरत गेला. स्त्रीनेसुद्धा पुरुषांनी सोयीने लादलेली बंधने ‘अलंकार’ समजून मिरवायला सुरुवात केली. स्त्रीच्या शरीरावर, मनावर या अलंकाराचे ओझे इतके वाढले की, तिची प्रचंड घुसमट व्हायला लागली. तरीही तिने गेल्या शतकापर्यंत मनावरच्या दडपणाची तक्रार केली नाही. स्त्री तिच्या होणाऱ्या पूजेत प्रसन्नता मानत होती.

भारत नवदुर्गेची पूजा करणारा संस्कृतीचा देश म्हणून जगभर मिरवत राहिला. मात्र वासनांध पुरुषांच्या अत्याचाराला बळी पडणाऱ्या ‘निर्भया’सारख्या प्रकरणाने समाज अस्वस्थ झाला. राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, रमाबाई आंबेडकर, मदर तेरेसा, सरोजनी नायडू आणि इंदिरा गांधींचा वारसा सांगणारा आपला देश महिलांच्या सुरक्षिततेबाबत आज अभिमानाने महिलानुकूल विचार मांडत आहे.

मात्र, हे सगळे फक्त भाषणे, गप्पा, पुस्तके, ग्रंथ, कथा-कविता, कादंबरी फार तर एखाद्या चित्रपटात किंवा वेबसीरिज पुरते मर्यादित होत आहे. बघितले, वाचले, काही क्षण विचार केला, फार तर टीव्ही डीबेटमधील चर्चा ऐकली की महिलांच्या प्रश्नांबद्दल कळवळा निर्माण होऊन आपण स्वत:ला ‘सोफिस्टिकेटेड’ झोनमध्ये घेऊन जातो.

महिलांना खऱ्या अर्थाने समानता मिळवून देणाऱ्या लैंगिक समता (जेंडर इक्वॅलिटी) या अतिशय महत्त्वाच्या विषयावर सगळीकडेच सोयीचे मौन पाळो जाणे धोक्याचा संकेत आहे. महिला सुरक्षित तर हव्यातच, मात्र त्या ‘आत्मनिर्भर’ होण्याची निकड आहे. जगभरातली शासन व्यवस्था महिलांच्या सबलीकरणासाठी वेगवेगळी पावले उचलली जात आहेत त्यातून काही सकारात्मक कृतीकार्यक्रमही समोर येत आहेत. मात्र शासनस्तरावरून होत असलेल्या प्रयत्नांना जोवर ‘सामाजिक समर्थन’ मिळत नाही, तोवर स्त्रियांना प्रत्येक स्तरावरील आपली लढाई कायम ठेवावी लागेल.

कल्पना चावला, सुनीता विल्यम, पी.टी. उषा या प्रातिनिधिक नावापुढील रेषा स्त्रियांना पुढे न्यावी लागेल. महिलांच्या उन्नती व विकासाच्या कामाचे अनेक आराखडे, मास्टर प्लॅन तयार केलेही जातील. मात्र समाजाच्या मनातील ‘स्त्रीत्व’जोवर पुरोगामी होणार नाही, तोवर स्त्रीला असुरक्षितेचा उंबरठा ओलांडता येणार नाही. आज समाजाने ‘स्त्रीत्व’ व ‘पुरुषत्व’ याची नव्याने मांडणी करण्याची गरज आहे. एकाच व्यक्तीमध्ये एकाच वेळी स्त्रीत्वही असते आणि पुरुषत्वही!

निसर्गाने स्त्री-पुरुषाला वेगवेगळी शरीरे दिली असली तरी गुणकर्मामध्ये त्याने असमतोल केला नाही. साधारणतः स्त्रीचे शरीर व मन काहीसे दुबळे-कमकुवत, नाजुक जाणवत असले तरी तिच्या धारणा, क्षमता, जिद्द मात्र प्रचंड कणखर असतात. पुरुषांच्या कणखर देह-मनामध्ये चिकाटीची, भावभावनांच्या ओलाव्याची कमी असते. ममत्व, ॠजुता, प्रेम, माया, स्नेह, हळवेपणाला ‘स्त्रीत्व’ म्हणता येईल. पुरुषांमध्ये आढळणाऱ्या वीरता, धडाडी, धैर्य, अहंकार यासारख्या कडक धोरणाला ‘पुरुषत्व’ संबोधल्या जाऊ शकते.

स्त्री जेव्हा घर सांभाळून नोकरी, व्यवसाय सांभाळते तेव्हा ती ‘स्त्रीत्व’ सांभाळून कार्यमग्न असते. एका अर्थी स्त्री स्वतःमधले ‘पुरुषत्व’ चांगल्या प्रकारे सिद्ध करते. एक स्त्री एकाचवेळी ‘स्त्रीत्व’ आणि ‘पुरुषत्व’ उत्तम निभावते. बहुतांश वेळा स्त्रिया आपल्या कार्याचा उत्तम ठसा उमटवितात. घरातील काही कामांची ‘पुरुष’ वर्गाला लाज वाटते आणि याच ठिकाणी माझा देश मागे सरकत चालला आहे. देशातील महिला याच मानसिकतेतून खूप खोलवर रुतून तरी बसत आहेत किंवा वर्षानुवर्षे मागे ढकलल्या जात आहे, हे समस्त मानव जातीचं दुर्दैव्य!

कवयित्री आसावरी काकडे यांच्या शब्दांनी स्त्रीत्वाचे नेमकेपण साधले आहे. आसावरी लिहितात,

स्त्री असणं म्हणजे

जतन करणं अस्तित्वाचे अक्षांश-रेखांश

रोखून धरणं महायुद्धाच्या शक्यता

सर्व मूल्यांचा आधार शाबूत ठेवणं

स्त्री असणं म्हणजे

सहवेदना...प्रेम...तितिक्षा!

पुरुषही पेलू शकतो असं स्त्रीपण

जशी स्त्री निभावतेय सहज पुरुषपण!!

चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, चीफ फायनान्शियल ऑफिसर, चीफ ऑपरेटिंग ऑफिसर, चीफ इन्फॉर्मेशन ऑफिसर अशा ‘सी’ या अक्षराने सुरू होणाऱ्या पदांवर स्त्री विराजमान होत आहे. या सर्व पदांची सुरुवात ‘सी’ या अक्षराने होते, म्हणून तर या पदांना ‘सी स्वीट’ म्हटले जाते. मात्र आजही केवळ २१ टक्के महिलाच प्रचंड संघर्षाने टप्प्याटप्प्याने कनिष्ठ पदांवरून पुरुषांची मक्तेदारी असलेल्या ‘सी स्वीट’च्या वरिष्ठ पदांवर विराजमान होत आहेत.

शेतीच्या बांध्यापासून कॉर्पोरेट जगापर्यंत देह, सौंदर्य या गुणवैशिष्ट्यांमुळे आणि कमकुवतपणा, भावनिकता या तथाकथित त्रुटींमुळे सर्वच स्तरावर स्त्रियांना स्वत:ला सिद्ध करण्यासाठी संघर्षाचा सामना करावा लागत आहे. आत्मनिर्भर भारतात कदाचित स्त्री ‘आत्मनिर्भर’ होईलही. मात्र तिच्यावर शतकानुशतके लादलेली मानसिक गुलामगिरी व समाजाचा स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल काय? हा खरा प्रश्न आहे.

वेगवेगळ्या विषयांवर समाजाने काय करावे यावर सगळे जग बोलते, पण प्रत्येकाने स्वत: या समाजाचा एक घटक आहोत आणि विद्यमान परिस्थिती बदलवून प्रश्न मिटतील हाच विचार मनात बाळगून तळागाळातील प्रत्येक महिलेची उन्नती करण्याची इच्छा असलेल्या समाजातील प्रत्येक व्यक्तीने ‘स्त्रीत्व’ आणि ‘पुरुषत्व’ हे समानार्थी शब्द समजायला हवेत. देह, रंग, रूप, सौंदर्य, क्षमता इत्यादी सर्व भेदभेदाची भावना दूर ठेवून प्रत्येक जण ज्या दिवशी स्त्री-पुरुष समान आहेत, असे समजतील-वागतील आणि कृतीत आणतील, त्यानंतर महिलांच्या उन्नतीसाठी फारसे स्वतंत्र कृतीकार्यक्रम घेण्याची गरज पडणार नाही.

- डॉ. प्रीती सवाईराम, सहायक प्राध्यापक, यशदा