मुंबई : राजस्थान ड्रग्ज तस्करी प्रकरणातील बुरखाधारी महिला अंडरग्राउंड झाल्याची माहिती समोर येत आहे. महिलेचा शोध सुरू असून, अधिक तपासासाठी अमली पदार्थ विरोधी पथक (एएनसी) राजस्थानला रवाना झाले आहे.राजस्थानच्या मंगीलाल काजोडमल मेघलाल (४०) याच्याकडून साडेसहा कोटींचे हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. त्याच्याकडील चौकशीत मुंबईतील बुरखाधारी महिलेचा सहभाग उघड झाला आहे. तिच्या शोधासाठी पथकाने मुंबईतील सांताक्रुझ, ग्रँटरोड, तसेच गोवंडी परिसरात छापे मारले. मात्र, महिलेचा थांगपत्ता लागलेला नाही. ती अंडरग्राउंड झाल्याचा संशय पथकाला आहे. महिला हाती लागताच, तिच्याकडून मुंबईतील मोठ्या साखळीचा उलगडा होणार आहे. यामध्ये राजकीय मंडळींचाही सहभाग असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ही महिला कोण आहे? तिची पाश्वभूमी काय आहे? मुंबईसह आणखी कुठे-कुठे ती ड्रग्जची तस्करी करते? अशा अनेक अनुत्तरित प्रश्नांचा उलगडा ती हाती लागल्यानंतरच होणार आहे. त्यामुळे तिच्या शोधासाठी एएनसीकडून कसून शोध सुरू आहे. लवकरच तिचा शोध लागेल, असा विश्वास पथकाने व्यक्त केला आहे.दुसरीकडे राजस्थानमधील म्होरक्या कैलास जैनही पसार आहे. त्याच्या शोधासाठी एएनसीचे पथक पुन्हा राजस्थानला रवाना झाले आहे, तसेच मंगीलालच्या चौकशीतून राजस्थानमधील आणखी माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. त्या दिशेनेही अधिक तपास सुरू असल्याची माहिती एएनसीने दिली.
‘ती’ बुरखाधारी महिला अंडरग्राउंड; तपास पथके राजस्थानला रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 3:46 AM