मुंबई : माझ्यावर विनयभंगाचा आरोप करणाऱ्या महिलेने आधी तक्रार दाखल केली आणि त्यानंतर माझ्यासोबत वाद घातला, त्यामुळे हा सर्व माझ्याविरोधात कट असल्याचा दावा अभिनेता नवाजुद्दीनने शुक्रवारी केला. ज्या महिलेने माझ्यावर विनयभंगाचा आरोप केला आहे, तिला आपण ओळखतही नसल्याचे नवाजुद्दीनने पत्रकारांना सांगितले.विनयभंगाचा आरोप असलेल्या नवाजुद्दिनने अंधेरीतील रहेजा क्लासिक क्लबमध्ये एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी त्याने विनयभंगाच्या आरोपाबाबत स्पष्टीकरण दिले. ‘ज्या महिलेने माझ्यावर विनयभंगाचा आरोप केला, तिला मी कधीही पहिलेले नाही. सध्या मी तिचाच शोध घेत आहे’, असे नवाजुद्दीनचे म्हणणे आहे. गुन्हा दाखल करण्यात आल्याची वेळ आणि विनयभंगाचा आरोप असणाऱ्या व्हिडीओ रेकॉर्डच्या वेळेत तफावत आहे. माझ्यावर गुन्हा आधी दाखल झाला आणि त्याच्या काही वेळानंतर संबंधित व्हीडीओ रेकॉर्ड करण्यात आल्याचेही त्याचे म्हणणे आहे. त्यामुळे हा सर्व माझ्याविरुद्ध असलेला कट असल्याचे तो म्हणाला. पार्किंगचा वाद हा वेगळाच विषय आहे. मी सेलिब्रिटी असल्याने मला टार्गेट करण्यात येत आहे. हा त्यांचा पब्लिसिटी स्टंट असल्याचीही शक्यता नाकारता येत नाही, माझ्या घरात माझी आई, पत्नी आणि मुलगी आहे. त्यामुळे साहजिकच मी त्यांच्याप्रमाणे इतर महिलांचाही आदर करतो, असे नवाजुद्दीनने सांगितले. नवाजुद्दीनचे वकील रिझवान सिद्दिकी यांनी आमचा काही दोष नसल्याने आम्हाला जामिनाची गरजच नाही. त्यामुळे आम्ही जामिनासाठी अर्ज करणार नाही. अखेरपर्यंत या खोट्या आरोपाविरोधात लढणार असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)
‘त्या’ मुलीला ओळखतच नाही
By admin | Published: January 30, 2016 3:02 AM