Join us

‘ती’ने रस्त्यावर राहून कमविले दहावीच्या परीक्षेत यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2020 4:12 AM

आसमा शेख : आईवडिलांसाठी घर घेण्याचे स्वप्न

सीमा महांगडे ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आई-वडील, लहान भाऊ आणि ती स्वत: असे चौघांचे कुटुंब असणाऱ्या आसमा शेख हिने दहावीच्या परीक्षेत ४० टक्के गुण मिळवून उत्तीर्णतेचे यश कमविले आहे. आधीच्या विद्यार्थ्यांकडून अर्ध्या पैशात पुस्तके विकत घेऊन आणि परीक्षेच्या ६ महिन्यांआधी क्लासेसचे शुल्क भरायला पैसे नसलेल्या आसमाच्या यशाने तिच्या आईवडिलांचा ऊर अभिमानाने फुलून गेल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. रस्त्यावर राहणाºया आसमाचे ४० टक्क्यांचे हे यश निश्चितच ९० टक्क्यांहून कमी नाहीआसमाचे वडील सलीम शेख यांचे कुटुंब आझाद मैदानाच्या बाजूला असलेल्या फुटपाथवर राहत आहेत. कधीतरी आपले घरही होईल हे स्वप्न उराशी बाळगून ते आपल्या दोन्ही मुलांना शिकवीत आहेत. आपण शिकलो नाही याची खंत त्यांना असली तरी आपली मुले अशिक्षित राहू नयेत हेच त्यांनी यानिमित्ताने मनाशी ठरविले होते, असे सलीम यांनी सांगितले.डोंगरीच्या हिरजीभॉय अल्लारखिया आणि लालजीभॉय साजन या शाळेमध्ये त्यांनी आसमाचा प्रवेश करून घेतला. कधी कुणाच्या सुतारकामाला हातभार लावत, तर कधी लिंबूपाण्याचा हातगाडा चालवीत सलीम यांनी आसमाचे शिक्षण केले़ नवीन पुस्तके विकत घ्यायला पैसे नाहीत म्हणून जुनी पुस्तके अर्ध्या किमतीत विकत घेऊन आतापर्यंत आसमाने अभ्यास केला. दहावीसाठी क्लासही लावला. पैशांअभावी तिला क्लास बंद करावा लागला. क्लासचे पैसे नसल्याने तेथील शिक्षकांनी शुल्काचा तगादा लावल्याने तिने स्वत:च अभ्यासाला सुरुवात केली आणि परीक्षा दिली.आसमाला दहावीच्या परीक्षेत ४० टक्के मिळाले असून तिच्या या यशाने सलीम यांना खूप आनंद झाला असल्याचे त्यांनी सांगितले. पुढे कला शाखेत प्रवेश मिळवायचे असून आईवडिलांसाठी काहीतरी करायचे ही जिद्द आसमाने बाळगली आहे. काहीही झाले तरी आईवडिलांना रस्त्यावरून हक्काच्या घरात न्यायचे हे स्वप्न आसमाचे असून यापुढेही तेच पूर्ण करण्यासाठी मेहनत करणार असल्याचे तिने सांगितले.