...आणि रिक्षाचा धावत पाठलाग करून तिने मोबाइल चोराला पकडले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 05:23 AM2018-04-05T05:23:01+5:302018-04-05T05:23:01+5:30

बसमधून उतरताना मोबाइल चोरीची चाहूल लागली. पाठोपाठ एक तरुण पळताना दिसला. हाच मोबाइल चोर असल्याच्या शक्यतेतून तिही त्याच्यामागे धावली. काही अंतरावर उभ्या असलेल्या रिक्षात बसून चोराने पळण्याचा प्रयत्न केला. तब्बल अर्धा तास चोराचा पाठलाग करत तिने त्याला धावत्या रिक्षातून खाली ओढल्याचा प्रकार पवईत पाहावयास मिळाला.

She followed the rickshaw and caught a mobile thief! | ...आणि रिक्षाचा धावत पाठलाग करून तिने मोबाइल चोराला पकडले!

...आणि रिक्षाचा धावत पाठलाग करून तिने मोबाइल चोराला पकडले!

Next

- मनीषा म्हात्रे
मुंबई  - बसमधून उतरताना मोबाइल चोरीची चाहूल लागली. पाठोपाठ एक तरुण पळताना दिसला. हाच मोबाइल चोर असल्याच्या शक्यतेतून तिही त्याच्यामागे धावली. काही अंतरावर उभ्या असलेल्या रिक्षात बसून चोराने पळण्याचा प्रयत्न केला. तब्बल अर्धा तास चोराचा पाठलाग करत तिने त्याला धावत्या रिक्षातून खाली ओढल्याचा प्रकार पवईत पाहावयास मिळाला. या जिगरबाज तरुणीचे धाडस पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या. या प्रकरणी पवई पोलिसांनी बबलू शेख (१९) याला अटक केली.
ठाण्यातील चेंदणी कोळीवाडा परिसरात मोदीनी बाबूराव सामंत (२५) ही तरुणी कुटुंबीयांसोबत राहते. तिचे वडील नौदलात नोकरीला आहेत. तर मोदीनी पवई येथे एका कंपनीत नोकरीस आहे. तिने सहा महिन्यांपूर्वी नवीन मोबाइल खरेदी केला होता. मंगळवारी रात्री तिने नेहमीप्रमाणे घरी जाण्यासाठी आयआयटी येथून बस पकडली. बसमधील गर्दीदरम्यान एक तरुण अचानक तिला धक्का देत पाठीमागून उतरण्याची घाई करू लागला. त्याचदरम्यान तिने मोबाइल तपासला तर तोही गायब होता. धावत असलेल्या तरुणानेच मोबाइल चोरल्याचा संशय तिला आला. तिने बस थांबविण्यास सांगितली आणि तिही चोराच्या मागे धावू लागली. त्याच्या हातात एखादे हत्यार असू शकते याची भीती न बाळगता तिचा पाठलाग सुरू होता. काही अंतरावर चोराने रिक्षात बसून पळण्याचा प्रयत्न केला; आणि तो मोबाइल साथीदाराच्या हातात सोपवला.
धावत तब्बल अर्ध्या तासाच्या पाठलागानंतर तिने चालत्या रिक्षातून त्याला खाली ओढले. त्यानंतर तेथे स्थानिकही जमले. तिने चोराच्या दोन कानशिलातही लगावल्या. घटनेची वर्दी लागताच पवई पोलीस तेथे दाखल झाले. त्यांनी तरुणाला ताब्यात घेतले.
तिने मोबाइल क्रमांकावर फोन केला तेव्हा एका तरुणाने फोन उचलला आणि कांजूर येथे येण्यास सांगितले. तिने मैत्रिणीसोबत कांजूरकडे धाव घेतली. मात्र तेथून फोन बंद लागला. तिने याबाबत पोलीस नियंत्रण कक्षास फोन करून मदत मागितली. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी तरुणीला पोलीस ठाण्यात आणले.

‘तो’ सराईत गुन्हेगार

तिने पकडून दिलेल्या चोराचे नाव, बबलू आक्रम शेख (१९) असल्याचे समोर आले. तो मानखुर्दचा रहिवासी आहे. त्याला मोबाइल चोरीच्या गुन्ह्यांत अटक करण्यात आली आहे. तो सराईत गुन्हेगार असल्याचा संशय पोलिसांना आहे

Web Title: She followed the rickshaw and caught a mobile thief!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.