शेतकऱ्यांसाठी तिने घेतलाय जलसंचयाचा वसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:07 AM2021-03-08T04:07:25+5:302021-03-08T04:07:25+5:30
शेतकऱ्यांसाठी तिने घेतलाय जलसंचयाचा वसा २४ वर्षांची सीईओ असलेल्या मैथिलीचा निर्धार स्नेहा माेरे लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : उच्च ...
शेतकऱ्यांसाठी तिने घेतलाय जलसंचयाचा वसा
२४ वर्षांची सीईओ असलेल्या मैथिलीचा निर्धार
स्नेहा माेरे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : उच्च शिक्षण घेऊनही मातीशी नाळ घट्ट ठेवून बळीराजाच्या दुःखाशी कनेक्ट राहण्याचा विचार जोपासणे हे हल्लीच्या काळात दुर्मीळच. मूळची यवतमाळची असलेल्या मैथिलीने ही आडवाट निवडली आणि मग याच वाटेवर चालत अवघ्या बळीराजाचे विश्व सोन्याचे केले. लिकरत एम्बी लिमिटेडचे एक युनिट असलेल्या ‘अवाना’च्या संस्थापक मैथिली अप्पलवार यांनी केला. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने २४ वर्षांच्या सीईओ असलेल्या मैथिलीशी संवाद साधला असता, शेतकऱ्यांना पाण्याच्या समस्येपासून मुक्त करण्याचा वसा घेतल्याचे तिने अधोरेखित केले.
अवानाने ‘जलसंचय’ प्रकल्पाच्या माध्यमातून किफायतशीर, सर्वसमावेशक जलसंवर्धन उपाययोजना शोधून काढली आहे. शेतकऱ्यांपर्यंत प्रत्यक्ष पोचून मैथिली यांनी पाणी साठवून आणि त्याचा गरजेच्या वेळी योग्य प्रकारे वापर करण्यापर्यंतचे शिक्षण दिले आहे. मैथिली यांनी शेतकऱ्यांना शेततळ्यात वापरले जाणारे पॉलिमर अस्तर, अर्थात चांगल्या दर्जाचे कापड पुरवण्यास सुरुवात केली. त्यांनी सुरू केलेल्या जलसंचयाच्या प्रकल्पासाठी दरवर्षी फक्त १ पैसा प्रतिलीटर या दराने खर्च येतो. ही रक्कम पाणी साठवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या याच आकाराच्या सिमेंट टाकीच्या खर्चाच्या फक्त एकदशांश एवढीच आहे. अगदी गरीब शेतकऱ्यांनादेखील याचा लाभ करून दिला असून, तीन वर्षांहूनही कमी कालावधीत मैथिली यांनी ५००० शेतकऱ्यांसोबत भागीदारीमध्ये २०० अब्ज लीटर पाण्याची बचत केली आहे. मैथिली म्हणाल्या, ‘कमी खर्चात मोठ्या प्रमाणावर यशस्वी होण्याची क्षमता असलेल्या नावीन्यपूर्ण संकल्पना मला प्रभावित करतात. त्यामुळे प्रत्येक वेळी नवीन तंत्रज्ञानासाठी खूप मोठी गुंतवणूक करणे आवश्यक नसते. फक्त गंभीर समस्येवर प्रभावी उपाय शोधणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांबरोबरच शहरातील किंवा ज्या ठिकाणी पाणी अडवून जिरवू शकतो, अशा प्रत्येक ठिकाणी सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी युवक व उत्साही लोकांनी मोठ्या संख्येने पुढे आले पाहिजे. गेल्या काही दिवसांत चेन्नईने गंभीर पाण्याच्या समस्येला तोंड दिले आहे. देशात २०३०पर्यंत पाण्याची मागणी उपलब्ध पुरवठ्यापेक्षा दुपटीने वाढलेली असेल. यावरून हे स्पष्टपणे दिसून येते की, प्रत्येकाने जागा असेल तिथे पाण्याची बचत, संवर्धन आणि पाण्याच्या भूस्तरामध्ये पुनःपुन्हा भर घालत राहणे आवश्यक आहे. या क्षेत्रात अजूनही महिलांचा मानसिक आणि प्रत्यक्ष सहभाग कमी आहे. महिलांचा सहभाग वाढल्यास येत्या काही वर्षांत कोणालाच पाण्यासाठी वणवण फिरावे लागणार नाही.’
मैथिली शेतकऱ्यांना फक्त शेततळ्यांची निर्मिती करण्यासच मदत करत नाही, तर त्यांनी सर्वोत्तम जागतिक तंत्रज्ञानदेखील विकसित केले आहे. तसेच, शेततळ्यासाठी शेतकऱ्यांना बँकांकडून अर्थसाह्य मिळवण्यास मदत करतात. इंटरनेट-ऑफ-थिंग्ज (आयओटी) तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांना शक्य तितक्या सर्वोत्कृष्ट पद्धतीने पाण्याचा वापर करण्यास उद्युक्त करतात. शिवाय जोडधंदा म्हणून आता मत्स्योत्पादनाकरिता उपयुक्त असे आधुनिक शेततळ्याचे कापड उपलब्ध करून देत आहेत.
.................