- मनीषा म्हात्रेलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अवघ्या चार दिवसांची होती मी. नक्कीच काहीतरी मोठे कारण असेल म्हणून तिने मला दूर करत एका संस्थेकडे सोपवले असावे. पण म्हणून तिच्याविषयी माझ्या मनात अजिबात आकस नाही. उलट मी आनंदी आहे, हेच तिला सांगत तिची वास्तपुस्त मला करायची आहे... २६ वर्षांची विद्या फिलिपॉन सांगत होती. तेव्हा तिच्या डोळ्यांत नकळत अश्रू तरळले.
साता समुद्रापार स्वीत्झर्लंडहून विद्या मुंबईत आली आहे, आपल्या दुरावलेल्या आईच्या शोधासाठी. चार दिवसांची असताना तिच्या आईने तिला विलेपार्लेच्या मिशनरी ऑफ चॅरिटी चर्च येथे सोडून दिले होते. ही १९९६ मधली गोष्ट. वर्षभर सांभाळ केल्यानंतर १९९७ मध्ये स्वीझर्लंडच्या फिलिपॉन शिक्षक दाम्पत्याने तिला दत्तक घेतले. फिलिपॉन दाम्पत्याने लाडाकौतुकात विद्याला वाढवले. तेथीलच एका शाळेत शिक्षिका म्हणून नोकरी करते. शिक्षण पूर्ण करत असतानाच तिला तिच्या खऱ्या आईबाबतचे प्रश्न अस्वस्थ करू लागले. जवळील कागदपत्रे आणि बालपणीच्या फोटोच्या आधारे तिने १० वर्षांपासून आई आणि कुटुंबीयांचा शोध सुरू केला. दोन वर्षांपूर्वी सॅम्युअल नावाच्या तरुणाशी विवाह जुळला. तो आयटी सेक्टरमध्ये नोकरीला आहे. तोही तिच्यासोबत मुंबईच्या उभ्या, आडव्या वाटा धुंडाळताना दिसत आहे. विलेपार्लेतील संस्थेसह दहिसरचा संपूर्ण परिसर त्यांनी पिंजून काढला आहे.
आईला आपल्या मुलांची काळजी असते. माझ्या आईने मला कुठल्या कारणाने किंवा परिस्थितीत सोडले हे तिलाच माहीत. पण तिलाही माझी काळजी वाटत असावी. मला तिला भेटून हेच सांगायचं आहे की, मी ठीक आहे. आनंदी आहे. शिक्षिका बनली अशा बऱ्याच गोष्टी तिला सांगायच्या आहेत. - विद्या फिलिपॉन, स्वीत्झर्लंड
चाळीची जागा इमारतीने घेतली... संस्थेकडून मिळालेल्या माहितीनुसार तिचा जन्म १९९६ चा आहे. संस्थेकडून तिचा बाळ असतानाच फोटो, कांबळी आडनाव आणि दहिसर रावळ पाडा हा पत्ता मिळाला आहे. मुलीला संस्थेत सोडण्यासाठी स्थानिक राजकीय मंडळींपैकी ज्यांनी मदत केली त्या व्यक्तींपर्यंत पोहचलो. मात्र त्यांनाही तिच्या आईबाबत जास्त आठवत नाही. तसेच चाळीच्या जागी इमारतीचे काम सुरू आहे.- ॲड. अंजली पवार, संचालिका, ॲडॉप्टी राइट्स काऊन्सिल, पुणे.
बालपणीचा फोटो आणि पत्ता एवढेच भांडवल नेदरलँड स्थित ‘अगेन्स्ट चाइल्ड ट्रॅफिकिंग ऑर्गनायझेशन काऊन्सिल’च्या अरुण डोल यांच्या संपर्कात विद्या आली. अरुण डोल आणि पुणेस्थित ‘ॲडॉप्टी राइट्स काऊन्सिल’च्या संचालिका ॲड. अंजली पवार यांच्या मार्फत या शोधमोहिमेला वेग आला. बालपणीचा फोटो आणि कांबळी हे आडनाव आणि दहिसर रावळ पाड्यातील पांडे चाळीचा पत्ता एवढ्याच भांडवलावर विद्या दुरावलेली नाळ शोधण्यासाठी मुंबईत परतली आहे.