‘ती’ सांभाळते गावचा कारभार

By admin | Published: March 8, 2016 02:20 AM2016-03-08T02:20:46+5:302016-03-08T02:20:46+5:30

राजकारणाचा किंचितही गंध नसतानाही गावच्या सरपंचपदाची जबाबदारी मोठ्या शिताफीने सांभाळण्याचे काम लव्हाळी या आदिवासी पाड्यातील दीपा पारधी ही २२वर्षीय तरुणी करीत आहे

'She' manages the village administration | ‘ती’ सांभाळते गावचा कारभार

‘ती’ सांभाळते गावचा कारभार

Next

पंकज पाटील, बदलापूर
राजकारणाचा किंचितही गंध नसतानाही गावच्या सरपंचपदाची जबाबदारी मोठ्या शिताफीने सांभाळण्याचे काम लव्हाळी या आदिवासी पाड्यातील दीपा पारधी ही २२वर्षीय तरुणी करीत आहे. जन्मजात अपंगत्व असतानाही त्यावर मात करून तिने यशाचे उत्तुंग शिखर गाठले आहे. अर्थात हे यश तिला मिळाले ते तिच्या शिक्षणामुळेच. शिक्षणाचा आणि राजकारणाचा समतोल साधत ती गावच्या विकासासाठी धडपडत आहे.
दीपा पारधी मूळची लव्हाळी आदिवासी पाड्यातील. घरची परिस्थिती बेताची असतानाही तिने दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. पुढे शिकण्याची इच्छा असतानाही आर्थिक परिस्थितीमुळे शिकता आले नाही. लक्ष फाउंडेशनच्या मदतीने तिने बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. पुढे मोठ्या भावाच्या इच्छेचा मान राखत डी.एड.साठी प्रवेश घेतला. तिथेही आर्थिक परिस्थिती आड आल्याने पहिले वर्ष पूर्ण झाल्यवर तिला खाजगी नोकरी करावी लागली. नोकरीतून मिळालेले पैसे जमा करून तिने डी.एड.चे शिक्षण पुन्हा सुरू केले. आज ती डी.एड.च्या शेवटच्या वर्षाचा अभ्यास घेत आहे.
दीपा तशी अभ्यासात सर्वसामान्य होती. मात्र तिच्या अपंगत्वाने तिला जगण्याची आणि संघर्षाची उमेद दिली. तिला जन्मजात उजवा हात नव्हता. तरीदेखील निराश न होता तिने आपल्या मेहनतीवर शिक्षण पूर्ण केले. ज्या गावात दहावीनंतर मुले शिक्षण सोडून रोजंदारी स्वीकारतात त्या गावात राहून आणि आपले अपंगत्व बाजूला सारून दीपाने आपले शिक्षण आजही सुरू ठेवले.
गावात सर्वाधिक शिकलेली दीपा ही पहिलीच तरुणी. त्यामुळे चरगांव ग्रुप ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत दिला उमेदवारी देण्यात आली. राजकीय गंध नसल्याने तिने आधी नकार दिला. मात्र गावातील एकमेव सुशिक्षित तरुणी असल्याने आणि महिलांचे आरक्षण असल्याने संपूर्ण लव्हाळी आदिवासी पाड्यामध्ये तिचेच नाव पुढे केले. गावकऱ्यांच्या हट्टामुळे तिनेही निवडणूक लढवित विजय मिळविला. चरगांव ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये ९ आदिवासी पाडे असल्याने या भागाचा विकास साधण्यासाठी चांगल्या नेतृत्वाची सरपंचपदी निवड होण्याची अपेक्षा होती. ही अपेक्षाही दीपाच्या रूपात पूर्ण झाली. दीपाला थेट सरपंचपदाची जबाबदारी देण्यात आली.
एकीकडे शिक्षण सुरू असताना दुसरीकडे गावाचा कारभार सांभाळण्याची जबाबदारी तिच्यावर पडली. अशा परिस्थितीतही तिने शिक्षणामध्ये खंड पडू न देता आपले शिक्षण आणि गावचा सरपंचपदाचा पदभार सांभाळत योग्य समतोल राखला आहे. २२ वर्षांची दीपा आज यशस्वीपणे गावाचा कारभार पाहत आहे. शासकीय योजनांची माहिती घेऊन त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी तिची सुरू असलेली धडपड हे ग्रामस्थ स्वत: पाहत आहेत. नवखी असतानाही चांगले काम ती करीत असल्याचे ते सांगत
आहेत.
ज्या गावात अद्यापही नळाचे पाणी नाही, त्या गावांना नळाद्वारे पाणी आणण्यासाठी ती पाठपुरावा करीत आहे. तसेच गावात उघड्यावर शौचालयाला बसू न देण्यासाठी तिने गावात ‘हगणदारीमुक्त गाव’ ही मोहीम राबविण्यास घेतली आहे. रस्त्यांची स्थिती सुधारणे, वीजपुरवठ्यात सुधारणा, शोश खड्डे तयार करून सांडपाण्याचे नियोजन करणे, शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी तिची सुरू असलेली धडपड तिच्या कर्तृत्वाची महती सांगणारी आहे.

Web Title: 'She' manages the village administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.