मुंबई : चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या करत, पतीने स्वत:वर हल्ल्याचा बनाव केल्याची खळबळजनक माहिती, नागपाडा येथील दाम्पत्यावरील हल्ला प्रकरणातून समोर आली. या प्रकरणी जुल्फी दळवी (४९) त्याच्याविरुद्ध पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केला आहे. नागपाडा येथील एका घरात रक्ताच्या थारोळ्यात सापडलेल्या दळवी दाम्पत्यामुळे मंगळवारी एकच खळबळ उडाली होती. यामध्ये समीरा जुल्फी दळवी यांचा मृत्यू झाला, तर जुल्फी गंभीर जखमी आहेत. या वेळी जुल्फी यांनी दिलेल्या माहितीत, काळे शर्ट घातलेल्या दोन अनोळखी इसमांनी घरात प्रवेश केला. ते पत्नीकडे पैशांची मागणी करत होते. मात्र, पैसे देण्यास नकार दिल्यामुळे त्यांनी पत्नीची हत्या करत, माझ्या हत्येचा प्रयत्न केल्याचे पोलिसांना सांगितले. त्यामुळे घटनेचे गांभीर्य लक्षात घेत, पोलीस उपायुक्त प्रवीण पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली नागपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय बसवत, गुन्हे पोलीस निरीक्षक सनस यांनी तपास सुरू केला.तपासात समोर आलेल्या माहितीने पोलीसही चक्रावले. मूळचे गुहागर येथील रहिवासी असलेले दळवी पत्नी समीरा आणि भाऊ अब्दुल्लासोबत नागपाडा येथील मंगली कदुरी चाळ परिसरात राहातात. त्याच परिसरात त्यांची पानाची टपरी आहे. दोघे मिळून हा व्यवसाय सांभाळत असत. पत्नी समीरा घरात खासगी शिकवणी घेत, तर दळवी कुलाबा येथील एका नामांकित हॉटेलमध्ये व्यवस्थापक पदावर काम करतो. त्याला तीन मुले आहेत. त्यापैकी एक आॅर्थोपेडिकमध्ये एमबीबीएस करत आहे, तर दुसरा मुलगा बारावी आणि मुलगी नववीत शिकते. दळवीला पत्नी समीराचे कुणासोबत बोलणे आवडत नव्हते. तो तिच्या चारित्र्यावर संशय घेई. त्यामुळे दोघांमध्ये वारंवार खटके उडायचे, शिवाय समीरा माहेरच्यांना पैसे देते, याचाही त्याला राग होता. यावर तोडगा काढण्यासाठी त्याची नातेवाईकांसोबत कर्नाटक येथे बैठक झाली होती. मंगळवारी सकाळी दोघांमध्ये यावरून पुन्हा वाद झाला. यातूनच जुल्फीने धारदार शस्त्राने तिची हत्या केली. (प्रतिनिधी)ही तर विकृती...जुल्फी याने आपल्या नववीतल्या मुलीकडूनही मोबाइल काढून घेतला होता. तो तिलाही कोणासोबत बोलून देत नसे, तसेच भावावरही तो संशय घेई. त्यामुळे भाऊ रात्री पानटपरीतच झोपत असे.
‘ती’ हत्या चारित्र्याच्या संशयातून; गूढ उलगडले
By admin | Published: March 30, 2017 7:26 AM