Join us  

‘ती’च खरी मुंबईची राखणदार

By admin | Published: March 08, 2017 5:48 AM

सर्वसामान्य महिलेप्रमाणेच तिलाही सणासुदीच्या वेळी, समारंभाच्या वेळी, आनंदी असताना नट्टापट्टा करून मिरवायला, तसे राहावेसे वाटत असते. मात्र समाजसेवेचा घेतलेला वसा

- मनीषा म्हात्रे,  मुंबई

सर्वसामान्य महिलेप्रमाणेच तिलाही सणासुदीच्या वेळी, समारंभाच्या वेळी, आनंदी असताना नट्टापट्टा करून मिरवायला, तसे राहावेसे वाटत असते. मात्र समाजसेवेचा घेतलेला वसा पार पाडण्यासाठी ती आपल्या इच्छा, स्वप्नांना बाजूला ठेवून मुंबईच्या रस्त्यांवर तैनात असते. रात्रीच्या अंधारात आपल्या बाळाला कुशीत घेऊन तिलाही झोपावेसे वाटत असतानाच इतरांची मुले सुखात झोपावी, ही सुरक्षेची जबाबदारी तिच्या खांद्यावर असते. कुटुंबाची चिंता दूर सारत अ‍ॅडजेस्टमेंटचे पांघरुण ओढत ती मात्र कर्तव्य बजावण्यासाठी सदैव तत्पर असते. अशात कुठलीही अपेक्षा न करता महिलांच्या सुरक्षिततेसाठी वावरणाऱ्या खाकीतील तिच्या सुरक्षेचा प्रश्न मात्र अनुत्तरितच राहतो. अशा वेळी जागतिक महिला दिनानिमित्त तिचा ’आदर करा’ हे सांगण्याची वेळ येते ही लाजिरवाणी बाब आहे. मुंबई पोलीस दलात डिटेक्शन, मिसिंग पथक, सुरक्षा गस्त पथक, वाहतूक महिला पोलीस, लोहमार्ग पोलीसमध्ये कुटुंबाची पर्वा न करता फक्त जनतेच्या सेवेसाठी पहारा देत पडद्यामागे असलेल्या काही महिलांचा प्रातिनिधिक म्हणून मांडलेला हा अनुभव...अरुणा नगरे - पोलीस शिपाई, वाहतूक पोलीस, मुलुंडरस्त्यांवर उन्हातान्हात ताटकळत उभे राहायचे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना अटकाव केल्यास त्यांना राग येतो. याच रागात उद्धटपणे बोलून ही मंडळी आमच्यावरच दबाव आणण्याचा प्रयत्न करतात. मात्र कायद्याने हात बांधले असल्याने त्यांना काही बोलणे शक्य नसते, असे अरुणा नगरे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. मात्र आम्ही त्यांच्या सुरक्षेसाठी त्यांना थांबवतो याचे भान त्यांना नसावे. असे अनेक अनुभव येत असतात. रात्रीच्या वेळेस ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्हच्या कारवाईदरम्यान अटकेच्या भीतीने भरधाव वेगाने सुटलेल्या चालकांची भीती वाटते. मात्र कर्तव्य बजावताना त्याकडे दुर्लक्ष करून पुढे जाणे गरजेचे असते. अशा वेळी पुरुष सहकाऱ्यांची मदत होते. ते नेहमीच मदतीसाठी हजर राहतात. प्रमुख अडचणी...बंदोबस्तादरम्यान शौचालयाची गैरसोय ही प्रमुख अडचण अनेक महिलांना उद्भवते. यावर काही तरी उपाय करणे गरजेचे आहे. तसेच अनेक गुन्ह्यांत आरोपींना पकडणारी लेडी आॅफिसर घरी जाताना मात्र साध्या कपड्यात असते. अशा वेळी कुठे तरी तिच्या मनातही असुरक्षिततेची भावना निर्माण होत असल्याचे लोकमतशी बोलताना सांगितले. शिवाय नागरिकांची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. कविता मोहिते, चार्ली (बिट मार्शल), वरळी पोलीस ठाणेनगरची रहिवासी असलेल्या कविता चार वर्षांपासून मुंबई पोलीस दलात काम करतात. कुटुंबीय गावी असल्याने त्या मुंबईत मैत्रिणीसोबत हॉस्टेलवर राहतात. सकाळी ८ ते रात्री ६ वाजेपर्यंत ही मंडळी महिलांच्या सुरक्षेसाठी गस्त घालत असतात. पोलीस ठाण्यात महिलांविषयी एखादी तक्रार प्राप्त होताच तिच्या निवारणासाठी तेथे दाखल होणे एवढेच त्यांच्या डोळ्यासमोर असते. अशा वेळी महिला पोलिसांबाबत चुकीच्या मानसिकतेमुळे हवा तसा प्रतिसाद मिळत नाही, त्याची खंत वाटते. मात्र कुठे तरी त्या वेळच्या परिस्थितीचा तो परिणाम असावा. अशा वेळी परिस्थिती आटोक्यात आणणे एवढेच नजरेसमोर असते, असे कविता यांनी सांगितले. मृदुला रोहित दिघे, पोलीस निरीक्षक लोहमार्ग पोलीस, मुंबई सेंट्रल गेली २५ वर्षे पोलीस दलात अनेक आव्हानात्मक जबाबदाऱ्या त्यांनी पेलल्या. बी.कॉम एलएलबीचे शिक्षण पूर्ण करून त्या १९९९ मध्ये पोलीस दलात दाखल झाल्या. उपपोलीस निरीक्षक म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली. काम करत असताना मानसिक शक्ती महत्त्वाची असते, असे त्यांचे म्हणणे आहे. एकत्र कुटुंब पद्धती. त्यात पतीच्या पाठिंब्यामुळे रात्री-अपरात्री घरी आले तरी सांभाळून घेतले गेले. त्यामुळे काम करत असताना कुटुंबाचा खूप मोठा आधार मिळाला. मी स्वत: टे्रनने प्रवास करते, माझ्या मते माझ्या सुरक्षेची जबाबदारी मीच घेतली पाहिजे, असा माझा समज आहे. त्यासाठी मी नेहमीच तत्पर असते. त्यामुळे या क्षेत्रात काम करताना नेहमीच चांगला अनुभव आला. महिला सेल हाताळत असताना महिलांच्या तक्रारी जवळून अनुभवल्या. पुरुषांच्या बरोबरीने त्यांनी अनेक गुन्ह्यांचा उलगडा केला आहे. सुरेखा सदानंद खाडे, पोलीस शिपाई, मुलुंड सुरक्षा गस्त पथक वाहनमहिलांना सुरक्षित वाटावे म्हणून मुंबईच्या रस्त्यांवर सुरक्षा गस्त पथकाचे वाहन आॅन ड्युटी २४ तास फिरताना दिसते. यामध्ये असलेली महिला पोलीस सगळीकडे लक्ष ठेवून असते. रात्रीच्या वेळेस गस्त घालत असलेल्या या व्हॅनवरील महिला पोलीस आहे सुरेखा खाडे. मुलुंड पोलीस ठाण्यात त्या कार्यरत आहेत. पती आणि दोन मुलांसोबत ठाणे परिसरात राहतात. मुलगी प्रियांका अकरावीचे शिक्षण घेतेय तर मुलगा ओमकार हा दहावीचे. त्याच्या दहावीच्या परीक्षेसाठी आपण किमान त्याच्यासोबत जावे म्हणून त्यांनी चक्क आठवडाभर काम केले आणि सुटी बदलून घेतली. सुटी मिळाल्यामुळे मुलालाही बरे वाटले. ऊर्मिला तिरोडकर, अंमलदार, कांजूर पोलीस ठाणेमूळच्या सिंधुदुर्गच्या रहिवासी असलेल्या ऊर्मिला या पती आणि १२ वर्षांच्या मुलासोबत विक्रोळी परिसरात राहतात. १९९१ पासून त्या पोलीस दलात काम करतात. मुलगा हा अंथरुणातच असतो. त्यात त्याच्यावर उपचार सुरू असल्याने त्यांची कसरत सुरू असते. अशा परिस्थितीतही नोकरीत त्या तत्परतेने काम करतात. अनेकदा रात्रीच्या नाकाबंदी वेळेस मात्र घराकडे आजारी असलेल्या मुलांच्या चिंतेने जीव कासावीस होत राहतो. मात्र नोकरीपुढे काहीच नाही. पुष्पा चवरे, पोलीस शिपाई, मुलुंड वाहतूक पोलीसपती आणि १२ वर्षांचा मुलगा यांच्यासोबत पुष्पा या कल्याण परिसरात राहतात. पती खासगी कंपनीत कामाला आहेत. अशात अनेकदा बंदोबस्तादरम्यान तारेवरची कसरत करावी लागते. अनेक अडचणी येतात, मात्र अशा वेळी अ‍ॅडजेस्टमेंट करत आम्ही काम करत असतो. सकाळी पाचच्या बंदोबस्ताला काही करून हजर राहणे गरजेचे आहे. अशा वेळी रात्री मी पोलीस आहे, मला कोणीही काही करणार नाही... अशी हिंमत स्वत:ला देत तो प्रवास करत असते, असे पुष्पा यांचे म्हणणे आहे. आता या प्रवासाचीही सवय झाली आहे. त्यामुळे काही वाटत नाही. रात्रीच्या ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्ह दरम्यान नेहमीच आम्ही तटस्थ असतो. वैष्णवी कोळंबकर, पोलीस अंमलदार, मिसिंग पथक, विक्रोळी पोलीस ठाणे रात्री दोनची वेळ. अल्पवयीन मुलीच्या शोधासाठी कोळंबकर त्यांच्या दोन पोलिसांसोबत उळवे गावात दाखल झाल्या. अनोळखी परिसर, त्यात चहूबाजूंनी भुंकणारे श्वान यांच्यातून दबक्या पावल्यांनी त्यांनी आरोपीच्या घराबाहेर सापळा रचला. त्याच्या सिम कार्डवरून हे पथक उळवे येथे दाखल झाले होते. आपल्यावर कोण कुठून हल्ला करेल या भीतीत त्या होत्या. मात्र मुलीच्या सुरक्षेपुढे त्यांनी कसलाही विचार न करता थेट मुलगा बाहेर येताच त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याने घातलेल्या गोंधळामुळे नागरिक जमा झाले. मात्र त्यांना समजावून त्या मुलीसह तेथून निघाल्या. मात्र असे अनेक अनुभव काम करताना येतात, असे त्यांचे म्हणणे आहे. कोळंबकर या मूळच्या सिंधुदुर्गाच्या रहिवासी आहेत. पती आणि १२ वर्षांच्या मुलासोबत त्या भांडुप परिसरात राहतात. पतीही पोलीस खात्यातच काम करतात. विक्रोळी पोलीस मिसिंग पथकात त्या पोलीस अंमलदार म्हणून काम करत आहेत. अल्पवयीन मुलांचा शोध घेतेवेळी घरातल्या मुलाची काळजी त्यांना सतावत असते. मात्र नोकरीपुढे काहीच नाही. सध्या मुलालाही सवय झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. अनेकदा दोघांनाही नोकरीमुळे घरी येणे शक्य झाले नाही. दीपाली कुलकर्णी,पोलीस उपनिरीक्षक, डिटेक्शन दादर पोलीस स्टेशनपाच वर्षांचा मुलगा, पती आणि सासू-सासरे यांच्यासोबत दीपाली या कल्याण परिसरात राहतात. एम कॉमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर चांगल्या पगाराची नोकरी करावी असा सर्वसामान्य मुलीप्रमाणे त्यांच्याही मनात विचार आला. असा विचार सुरू असताना २००० मध्ये मुंबई पोलीस भरतीत मैत्रिणीसोबत त्यांनीही उडी घेतली. भरतीसाठी लागलेल्या लांबलचक रांगेला पाहूनच त्यांच्या मनात धडकी भरली. मात्र बाबांच्या आग्रहाखातर त्या थांबल्या. त्यात शाळा सोडल्याचा दाखलाही घरीच विसरली. कागदपत्रांअभावी तशीही हकालपट्टी होईल यामुळे त्यांनी बाबांना फोन करून घरी येते, असे सांगितले. मात्र बाबांनी तेथेच थांब म्हणून सांगत भावाला शाळेचा दाखला घेऊन तेथे पाठविले आणि पहिल्याच फेरीत त्यांची निवड झाली. तेव्हा त्यांच्या मनात अनेक गोष्टींनी काहूर माजवला होता. अशात भिवंडी पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली. पहिल्या दिवसापासूनच त्यांना डिटेक्शनमध्ये आवड होती. २००९ मध्ये पोलीस उपनिरीक्षकाची परीक्षा पास करत त्यांची मालाड येथे बदली झाली. तेथून भांडुप आणि आता दादर पोलीस ठाण्यात डिटेक्शनची जबाबदारी सांभाळते. डिटेक्शन म्हटले की जणू पुरुषी हक्क. अशात अगदी पुरुषांच्या बरोबरीने कुलकर्णी या काम करत आहेत.