मुंबई : आई ओरडली म्हणून २१ वर्षीय तरुणीने स्वत:चेच अपहरणनाट्य रचल्याची धक्कादायक माहिती ती घरी परतल्यानंतर उघड झाली. मात्र, यामुळे पोलिसांची दमछाक झाली होती.‘गर्दुल्ला पाठलाग करतोय. मला खूप भीती वाटतेय. तू फोन सुरूच ठेव’ म्हणत २१ वर्षीय तरुणीने आईला कॉल केला. कॉल सुरू असतानाच तरुणीने किंचाळी फोडली आणि त्यानंतर तिचा मोबाइल बंद झाला. तिच्याशी काहीही संपर्क होईनासा झाला. त्यामुळे तिच्या आईवडिलांची चिंता वाढली.तरुणीच्या शोधात तिच्या आईवडिलांनी संपूर्ण माहिम परिसर पिंजून काढला. तिचा बरीच शोधाशोध करूनही तिचा कुठेच शोध न लागल्यामुळे अखेर त्यांनी याबाबत माहिम पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करीत अधिक तपास सुरू केला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांची पथके तरुणीच्या शोधासाठी रवाना झाली. रात्रभर मुंबईतील सर्व परिसर पिंजून काढण्यात आला. मात्र तरुणीबाबत काहीही माहिती मिळाली नाही.तिचा शोध सुरू असताना, शुक्रवारी दुपारी १२ च्या ठोक्याला तिने घर गाठले. तेव्हा, आई ओरडली म्हणून तरुणीनेच आमहरणनाट्याचा बनाव रचल्याची माहिती समोर आल्यानंतर तिच्या आईवर डोक्याला हात लावण्याची वेळ ओढवली. तरुणीने कुटुंबीयांना दिलेल्या माहितीनुसार, तिने वांद्रे येथील महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. पुढे केबिन क्रूचे प्रशिक्षण घेतले. त्यात तिची नोकरीसाठी निवड झाली. मात्र या नोकरीवरूनच आई व तिच्यात खटके उडाले. आई ओरडल्याने तिने बुधवारी भीतीचा कॉल करत, मैत्रिणीचे घर गाठल्याचे कुटुंबीयांना माघारी परतल्यानंतर सांगितले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनीही याबाबत नोंद करून घेतली आहे. मुलगी सुखरूप घरी परतल्याने कुटुंबीयांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.
आई ओरडली म्हणून तिनेच रचले अपहरणनाट्य; तरुणी सापडली
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2019 3:43 AM