४ हजार ७०० किमी अंतर केले पार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : रस्तेविषयक जनजागृती करण्यासह महिला सुरक्षेविषयी लोकांपर्यंत संदेश पोहोचविण्यासाठी मुंबईच्या उपनगरात वास्तव्यास असलेल्या अंकिता कारेकर या तरुणीने मुंबई - कन्याकुमारी - मुंबई असा प्रवास करीत सर्वांसमाेर आदर्श ठेवला.
अंकिता कारेकर ही तरुणी बोरीवलीत वास्तव्यास आहे. तिने यापूर्वी मुंबई - लडाख - मुंबई असा प्रवास केला. मुळात तिला काश्मीर - कन्याकुमारी - काश्मीर असा प्रवास करायचा होता. मात्र ताे करणे शक्य झाले नाही. त्यामुळे तिने मुंबई - कन्याकुमारी - मुंबई असा प्रवास करत रस्ते सुरक्षा आणि महिलाविषयक सुरक्षेबाबत जनजागृती केली. अंकिताने दिलेल्या माहितीनुसार, तिने २ फेब्रुवारी रोजी या प्रवासाला सुरुवात केली आणि १९ फेब्रुवारीला तो पूर्ण झाला.
४ हजार ७०० किलोमीटरच्या या प्रवासात एकूण चार जण सहभागी झाले होते. यात अंकिता केवळ एकमेव महिला होती. उर्वरित तीन पुरुष होते. संपूर्ण प्रवासात महिला सुरक्षा आणि रस्तेविषयक सुरक्षा या दोन विषयांवर जनजागृती करण्यावर भर देण्यात आला. हे सर्व करताना कोणत्याही प्रकारचे प्रायोजक घेण्यात आले नव्हते. जो काही खर्च झाला ताे आमच्या खिशातून केला, असे तिने सांगितले.