मनसुख हिरेन यांच्या भावाचा दावा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अँटिलियाच्या परिसरात पार्क केलेली स्काॅर्पिओ सचिन वाझेने आपल्या भावाकडून विकत घेतली होती, ती गहाळ झाली नव्हती. वाझेने त्याबाबत तक्रार देण्यास सांगितले होते, असा जबाब मृत मनसुख हिरेन यांचा भाऊ विनोदने एटीएसला दिल्याचे समजते.
मनसुख हिरेन यांनी काळ्या रंगाची स्काॅर्पिओ हरविल्याबद्दल विक्रोळी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. मात्र त्या गाडीची कागदपत्रे सॅम न्यूटनच्या नावावर असल्याचे स्पष्ट झाले. त्याने गाडीच्या स्पेअर पार्ट्सचे पावणेदोन लाख रुपये न दिल्याने ती मनसुख यांनी आपल्याकडेच ठेवून घेतली होती, असे पहिल्यांदा सांगितले जात होते. मात्र त्याचे भाऊ विनोद यांनी ती गाडी आपल्या भावाकडून सचिन वाझेने विकत घेतली होती, वाझे आवश्यकतेनुसार ती वापरत होता, मात्र ती हरविल्याबाबत वाझेने पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास सांगितले होते, अशी माहिती एटीएसच्या अधिकाऱ्यांना दिल्याचे सांगण्यात आले. एनआयए आता त्याबाबत पुन्हा त्याच्याकडून माहिती घेणार आहे.
* ट्रायडेन्टमध्ये वाझेच्या भेटीला महिला
सचिन वाझेने बनावट नावाने ट्रायडेन्ट हॉटेलमध्ये १६ ते २० फेब्रुवारीला मुक्काम केला होता, त्यावेळी एक महिला त्याच्या भेटीला वारंवार आल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून स्पष्ट झाले. एनआयएने त्याबाबत माहिती विचारली असता तो त्याबाबत सत्य सांगत नाही, त्यामुळे त्या महिलेला बोलावून तिच्याकडे वाझेबद्दलची माहिती घेण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
........................