‘ती’ साधत होती मृत आईशी संवाद, तीन दिवसांपूर्वीच झाले होते निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 06:41 AM2018-02-20T06:41:35+5:302018-02-20T06:41:39+5:30

वडिलांच्या निधनानंतर भाऊ वेगळा झाला. वृद्ध आई आणि ती दोघेच एकमेकांसाठी आधार ठरल्या. दोघींनी स्वत:ला घरात कोंडून घेतले

'She' was drawing the conversation with the deceased mother, died three days ago | ‘ती’ साधत होती मृत आईशी संवाद, तीन दिवसांपूर्वीच झाले होते निधन

‘ती’ साधत होती मृत आईशी संवाद, तीन दिवसांपूर्वीच झाले होते निधन

Next

मनीषा म्हात्रे 
मुंबई : वडिलांच्या निधनानंतर भाऊ वेगळा झाला. वृद्ध आई आणि ती दोघेच एकमेकांसाठी आधार ठरल्या. दोघींनी स्वत:ला घरात कोंडून घेतले. खिडकीतूनच त्या शेजा-यांशी संवाद साधत. फक्त भाऊ येताच दरवाजा उघडत असे. अशातच आईचे निधन झाले. तरीही ३ दिवस मुलगी मृत आईशी संवाद साधत होती.

सोमवारी दुर्गंधी येऊ लागल्याने कुर्ला पश्चिमेकडील एव्हरग्रीन को-आॅप. हौसिंग सोसायटीत पोलीस धडकले. तेव्हा आई झोपली असून भाऊ आल्याशिवाय दरवाजा उघडणार नाही, असे ४७ वर्षीय मुलगी मुमताज हिने बजावले. भाऊ आल्यानंतरच तिने दरवाजा उघडला तेव्हा कुजलेल्या अवस्थेत आईचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला. तपासात तीन दिवसांपूर्वीच मुमताजची आई साबीर सुभान शेख (६५) हिचा मृत्यू झाल्याचे आढळले. या प्रकरणी सोमवारी विनोबा भावे नगर पोलिसांनी घटनेची नोंद करत तपास सुरू केला. शेख या ४७ वर्षीय मुलगी मुमताजसोबत राहायच्या. मुमताज मनोरूग्ण आहे. वडिलांच्या निधनानंतर सीए झालेला मुलगा कुटुंबीयांसह वेगळा झाला. मात्र तो दोघींचा खर्च भागवत होता. महिन्यातून अथवा आठवड्यातून एकदा तो दोघींची चौकशी करीत असे. दोघी मायलेकींनी स्वत:ला घरात कोंडून घेतले होते. त्या कुणाशीच बोलत नसत. कोणी विचारायला आले तरी खिडकीतून संवाद साधत.

संशयास्पद खुणा आढळल्या नाहीत
तीन दिवस मुलगी मृत आईशी संवाद साधत असल्याची माहिती समोर आली. या घटनेने सर्वांनाच सुन्न केले. घटनास्थळी कुठल्याही संशयास्पद खुणा आढळून आलेल्या नसून अधिक तपास सुरू असल्याची माहिती विनोबा भावे नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारत भोईटे यांनी दिली. सोमवारी सहाच्या सुमारास त्यांच्या घरातून दुर्गंधी येत असल्याची माहिती विनोबा भावे नगर पोलिसांना मिळाली. घटनेची वर्दी लागताच पोलीस तेथे धडकले. त्यांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र ‘आई झोपली आहे, आवाज करू नका, भाऊ आल्याशिवाय दरवाजा उघडणार नाही,’ असे तिने पोलिसांना ठणकावून सांगितले.पोलिसांनी भावाला बोलावून घेतले. अग्निशमन दलाचे जवानही घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दरवाजा तोडला. तेव्हा साबीर यांचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला.

Web Title: 'She' was drawing the conversation with the deceased mother, died three days ago

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.