अन्य आरोपींचा शोध सुरू; ताेतया पाेलीस बनून १२ काेटींचा गंडा प्रकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : तोतया पोलीस बनून लंपास केलेली १२ कोटी रुपयांची रक्कम नेमकी कुणाची आहे? याचे गूढ कायम असून, या प्रकरणातील अन्य आरोपींच्या शोधासाठी पथके ठिकठिकाणी रवाना झाली आहेत. तसेच कर वाचविण्यासाठी ती रक्कम हवालामार्गे कॅनडाला पाठवीत असल्याचा दावा विलेपार्ले पोलिसांनी न्यायालयात केला. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
चंदीगढमध्ये वास्तव्य करणाऱ्या दिनेश दुरेजा (वय ५४) याला हवालामार्फत १२ कोटी रुपये कॅनडा येथे पाठविण्याची जबाबदारी एका मंदिराच्या विश्वस्ताने सोपविली होती. त्यानुसार, त्याने गफूर मोहम्मद सतार मोहम्मदशी संपर्क साधला. ठरल्याप्रमाणे तो गफूरसोबत मुंबईत आला. मुंबईतील दिनेश पाथरे आणि आरिफ सय्यदशी संपर्क साधून १५ फेब्रुवारीला हॉटेल ताज येथे त्यांची भेट घेतली. पुढे आणखी काहीजण यात सहभागी झाले.
व्यवहार ठरताच १७ फेब्रुवारीला दुरेजा आणि गफूर १२ कोटी रुपये घेऊन बावा इंटरनॅशनल हॉटेल येथे गेले. पुढे ही रक्कम मालाडमधील अंगडियाच्या कार्यालयात पाठविण्यात आली. पैशांची मोजणी सुरू असताना तोतया पोलिसांनी छापा टाकून हे पैसे दहशतवादी संघटनांसाठी परदेशात जाणार असल्याचे सांगत ताब्यात घेतले. त्यानंतर तेथून पळ काढला होता. दिनेशच्या सांगण्यावरून या रकमेची फिल्मी स्टाईलने चोरी झाली.
या प्रकरणात आतापर्यंत नऊ आरोपींना अटक करण्यात आली असून, अन्य आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना झाली आहेत. प्राथमिक चौकशीत कर वाचविण्यासाठी हे पैसे हवालामार्फत कॅनडाला पाठविण्यात येणार असल्याचे पोलिसांचे म्हणणे असून, याबाबत पाेलीस अधिक तपास करीत आहेत.
हा विश्वस्त नेमका कोण आहे, याचे गूढ कायम आहे. याबाबत पोलिसांकडून माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. कॅनडाला हे पैसे कुणाकडे जाणार होते? त्याचा उपयोग कशासाठी होणार होता? यामागे काही राजकीय कनेक्शन आहे का? याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.
.......................................