Join us  

‘ती’ अनधिकृत बांधकामे पाडणार?

By admin | Published: March 20, 2015 10:49 PM

अंबरनाथ रस्त्याच्या रुंदीकरणात अडथळा ठरणारी उल्हासनगर महापालिका क्षेत्रातील शासकीय जमिनीवर बांधलेली ८२१ अनधिकृत बांधकामे तोडण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे़

नारायण जाधव ल्ल ठाणेमहाराष्ट्र सरकारने उल्हासनगर महापालिकेने केलेला ठराव विखंडित केल्याने राज्य महामार्ग क्रमांक ३५ च्या अर्थात कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या रुंदीकरणात अडथळा ठरणारी उल्हासनगर महापालिका क्षेत्रातील शासकीय जमिनीवर बांधलेली ८२१ अनधिकृत बांधकामे तोडण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे़ यामुळे एमएमआरडीए आणि उल्हासनगर मनपा ही बांधकामे कधीही तोडू शकणार आहे़मतांच्या राजकारणासाठी उल्हासनगर महापालिकेतील तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी २० नोव्हेंबर २०१३ रोजी ठरावाद्वारे हा मार्ग १०० ऐवजी ८० फुटांचा करण्याचा निर्णय घेत ही बांधकामे तोडू नये, अशी भूमिका घेतली होती़ मात्र, विकास आराखड्यातील नियोजनाप्रमाणे हा रस्ता इतर ठिकाणी १०० फुटांचाच असल्याने केवळ उल्हासनगर महापालिका क्षेत्रात तो ८० फुटांचा केल्यास आधीच बकाल असलेल्या त्या शहरात वाहतूककोंडी होऊन नियोजन पूर्णत: कोलमडण्याची भीती होती़ याबाबत, एमएमआरडीएसह सर्व स्तरांतून विरोध झाल्याने जनक्षोभ टाळण्यासाठी उल्हासनगर महापालिका आयुक्तांनी २० जानेवारी २०१४ रोजी शासनास पत्र पाठवून महासभेने मंजूर केलेला २० नोव्हेंबर २०१३ चा ठराव क्रमांक ३२ विखंडित करण्याची मागणी केली होती़ मात्र, मधल्या काळात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लागल्याने ऐन निवडणुकीत हा मुद्दा तापू नये, म्हणून महाराष्ट्र शासनाने याबाबतचा निर्णय प्रलंबित ठेवला होता़ परंतु, अखेर नगरविकास खात्याने गुरुवारी महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील कलम ४५१ नुसार हा ठराव निलंबित करून संबंधितांनी आपले निवेदन ३० दिवसांच्या आत द्यावे, असा निर्णय घेतला आहे़कल्याण-अंबरनाथ-बदलापूर-वांगणी हा मार्ग १०० फुटांचा रुंद केल्यास त्यात उल्हासनगरातील त्याच्या डाव्या बाजूकडील ४५० व उजव्या बाजूकडील ३६१ व इतर अशा शासकीय जमिनीवर बांधलेल्या ८२१ अनधिकृत बांधकामांसह सेवावाहिन्या बाधित होणार आहेत़ यात साईबाबा मंदिर ते शांतीनगरपर्यंतच्या रस्त्याचा भाग आहे़