मुरुड : रेवदंडा बंदरानजीक तब्बल १९०० टन लोखंड वाहतूक करणाऱ्या एम.व्ही. प्रियंका मालवाहू जहाजाचा सोमवारी सकाळी नांगर तुटला आणि हे जहाज भरकटले. ऐन भरतीच्या वेळी जहाज भरकटल्याने जहाजावर तैनात १६ खलाशांच्या जिवितास धोका निर्माण झाला.जहाज भरकटल्याची सूचना मुंबई मेरीटाईम रेस्क्यू को आॅर्डिनेशन सेंटरसह मुरुड तटरक्षक दलाला कळली. जोरदार वारा आणि खवळलेल्या समुद्रात हे जहाज रेवदंड्याजवळील थेरोंडा खाडीमध्ये भरकटत गेले आणि एका बाजूला कलंडले. जहाज बुडते आहे य भीतीने ५ खलाशांनी जीवरक्षक बोटीवरून किनारा गाठला, मात्र उर्वरित ११ खलाशांचे जीव टांगणीला लागले. मात्र यावेळी धीर न सोडता परिस्थिती गंभीर असूनही त्याचे गांभीर्य ओळखून तटरक्षक दलाच्या जवानांनी हेलीकॉप्टरच्या मदतीने ११ जणांची सुखरूप सुटका केली व त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले. वेलस्पन कंपनी साळाव या कंपनीच्या मालकाला यांसदर्भात नोटीस पाठवून जहाजातील तेलसाठा व अन्य इंधन लवकरात लवकर काढून घेण्याचे आदेश देण्यात आल्याचे कमांडंट आर. के. सिंह यांनी सांगितले. या बचाव कार्यात डेप्युटी कमांडंट अबून नेरवाल, अधिकारी जे. के. जयस्वामी, प्रदीप भांगरे, एस. के. सुमन, उत्तम नावीक आदींचा समावेश होता. (वार्ताहर)
बुडत्या जहाजावरील खलाशांची सुटका
By admin | Published: July 16, 2014 12:34 AM