शीना बोरा जिवंत...इंद्राणी मुखर्जीचा दावा; ५ जानेवारीचे CCTV फुटेज सादर करण्याचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2023 06:29 AM2023-01-13T06:29:39+5:302023-01-13T06:29:51+5:30
विमानतळावर शीना बोरासारख्या दिसलेल्या मुलीची माहिती व विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेज सादर करण्यासाठी इंद्राणीने गेल्या शुक्रवारी विशेष न्यायालयात अर्ज केला.
मुंबई : गुवाहाटी विमानतळावर शीना बोरासारखीच मुलगी दोन वकिलांना दिसल्याचा दावा शीनाची हत्या केल्याचा आरोप असलेल्या इंद्राणी मुखर्जी हिने विशेष न्यायालयात केला. इंद्राणीचा हा दावा खोटा असल्याचे केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) न्यायालयाला सांगितले. मात्र, न्यायालयाने इंद्राणीचा अर्ज स्वीकारत विमानतळावरील ५ जानेवारीचे सीसीटीव्ही फुटेज सादर करण्याचा आदेश गुवाहाटी विमानतळ प्राधिकरणाला गुरुवारी दिला.
विमानतळावर शीना बोरासारख्या दिसलेल्या मुलीची माहिती व विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेज सादर करण्यासाठी इंद्राणीने गेल्या शुक्रवारी विशेष न्यायालयात अर्ज केला. सीबीआयने त्यावर आक्षेप घेतला. काही महिन्यांपूर्वीही इंद्राणीने श्रीनगरमध्ये शीनासारखी दिसणारी मुलगी पाहिल्याचे सांगितले. इंद्राणी केवळ न्यायालयाची दिशाभूल करून खटल्यास विलंब करत असल्याचे सीबीआयने न्यायालयाला सांगितले.