Join us

शीना बोरा हत्याप्रकरण  : इंद्राणी परदेशी नागरिक , महत्त्वाच्या साक्षीदारांवर दबाव आणू शकते

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2020 17:43 IST

इंद्राणीच्या जामिनाला सीबीआयचा विरोध

 

मुंबई : शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी इंद्राणीला ४५ दिवस तात्पुरते जामिनावर सोडण्यास सीबीआयने विरोध दर्शविला. इंद्राणी मुखर्जीला ही सवलत देता येणार नाही कारण ती ब्रिटनची नागरिक आहे. तसेच ती महत्त्वाच्या साक्षीदारांवर दबाव आणू शकते, असे सीबीआयने शुक्रवारी विशेष न्यायालयाला सांगितले.

कारागृहात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने आपल्यालाही त्याचा संसर्ग होईल, या भीतीने इंद्राणीने आपलयाला ४५ दिवसांचा तात्पुरता जामीन मंजूर करावा, यासाठी विशेष न्यायालयात अर्ज केला. या अर्जावर सीबीआयने आक्षेप घेतला.

खटल्यात आणखी महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंदविणे बाकी आहे. इंद्राणी जामिनावर सुटली तर ती  त्यांच्यावर दबाव टाकण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच तिच्याकडे ब्रिटनचा पासपोर्ट आहे, असे सीबीआयने न्यायालयाला सांगितले.

इंद्राणीची कारागृहात योग्य ती काळजी घेण्यात येईल. तसेच तिला योग्य उपचार करण्यात येतील, असे आश्वासन सीबीआयने न्यायालयाला दिले.

इंद्राणीवर ठेवण्यात आलेले आरोप सिद्ध करण्यासाठी पुरेसे पुरावे आपल्याकडे आहेत, असा दावाही तपास यंत्रणेने केला आहे. 

पैशाच्या वादातून स्वतःच्या मुलीच्या हत्येचा कट रचून तिची हत्या केल्याचा आरोप इंद्राणीवर आहे. 

कोरीनामुळे आपल्यावरील खटला पुन्हा कधी सुरू होईल, याबाबत अनिश्चितता असल्याने आपला जामीन मंजूर करावा, अशा विनंती इंद्राणीने न्यायालयाला केली आहे. 

टॅग्स :इंद्राणी मुखर्जी