शीना बोराच्या जळालेल्या हाडांचे अवशेष गायब, हाडे सापडत नसल्याची सीबीआयची कोर्टात कबुली
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2024 07:29 AM2024-06-15T07:29:40+5:302024-06-15T07:30:17+5:30
Sheena Bora Murder Case: शीना बोराच्या जळालेल्या हाडांचे अवशेष सापडत नसल्याची कबुली केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) कोर्टात दिल्याने खळबळ उडाली आहे.
मुंबई : शीना बोराच्या जळालेल्या हाडांचे अवशेष सापडत नसल्याची कबुली केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) कोर्टात दिल्याने खळबळ उडाली आहे. हाडांच्या या पुराव्याच्या आधारावरच जे.जे. रुग्णालयातील अॅनाटॉमी विभागाच्या सहायक प्राध्यापकांची साक्ष होणार होती. हाडे सापडत नसल्याने आतापर्यंत तीनदा सुनावणी तहकूब करावी लागली आहे. आता पुढील सुनावणी २७ जून रोजी होणार आहे.
शीना बोराची हत्या तिची आई इंद्राणी मुखर्जीने केल्याचा आरोप सीबीआयने केला आहे. इंद्राणीचा पहिला पती संजीव खन्ना आणि ड्रायव्हर श्यामवर रायने २०१२ मध्ये शीना बोराची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर, मृतदेह रायगड जिल्ह्यातील पेणमध्ये जाळण्यात आल्याचा आरोप आहे. पोलिसांनी शीनाचा सांगाडा पुरावा म्हणून जप्त केला होता. सरकारी वकील सी.जे. नंदोडे यांनी याबाबत विशेष सीबीआय कोर्टात पुरावा म्हणून ग्राह्य धरलेला सांगाडा शोधूनही सापडला नसल्याची माहिती दिली. जे.जे.तील फॉरेन्सिक तज्ज्ञ डॉ. झेबा खान यांच्या जबाबानंतर शीनाच्या सांगाड्याची माहिती समोर आली होती. डॉ. खान यांनी २०१२ मध्ये फॉरेन्सिक लॅबमध्ये हाडांचा तपास केल्यानंतर ही माणसाचीच हाडे असल्याचा निष्कर्ष दिला होता. आता सांगाडा आणि हाडे गायब झाल्याने डॉ. खान यांचा जबाब पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यास सरकारी वकिलांनी तयारी दर्शवली आहे. प्रकरण कमकुवत करण्यासाठी सांगाडा आणि हाडे गायब केलीत का, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.