शीना व्होरा हत्या : पीटर, इंद्राणी मुखर्जीशी नाते नाही - देवेन भारती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2018 12:58 AM2018-07-04T00:58:31+5:302018-07-04T00:58:49+5:30
शीना बोरा हत्येमधील आरोपी पीटर मुखर्जी व त्याची पत्नी इंद्राणी मुखर्जी यांच्याशी कोणतेही नाते नाही, अशी साक्ष ज्येष्ठ आयपीएस अधिकारी देवेन भारती यांनी मंगळवारी विशेष न्यायालयात दिली.
मुंबई : शीना बोरा हत्येमधील आरोपी पीटर मुखर्जी व त्याची पत्नी इंद्राणी मुखर्जी यांच्याशी कोणतेही नाते नाही, अशी साक्ष ज्येष्ठ आयपीएस अधिकारी देवेन भारती यांनी मंगळवारी विशेष न्यायालयात दिली. सलग दुसऱ्या दिवशी त्यांची साक्ष नोंदविण्यात आली.
शीना व्होराची हत्या करण्यापूर्वी व त्यानंतर काही दिवसांनी इंद्राणीने अनेकदा आपल्याला कॉल का केला, याचे नेमके कारण देवेन भारती यांना आठवत नव्हते. सध्या ते पोलीस सहआायुक्त (कायदा व सुव्यवस्था) आहेत. शीना हत्या प्रकरणाचा तपास करणाºया पथकात त्यांचाही समावेश होता.
इंद्राणीने तिच्या नातेवाइकाचा फोन ट्रेस करण्यासाठी आपल्याला कॉल्स केलेले असावेत, असे भारती यांनी सांगितले. शीनाची हत्या होण्याच्या चार दिवस आधी इंद्राणीने भारती यांना ११ वेळा फोन केला होता. त्यानंतर स्पेनमधूनही भारती यांना फोन केल्याचे रेकॉर्डवर आहे.
भारती यांनी मुखर्जी दाम्पत्याला अनेकदा भेटल्याचे कबूल केले. ‘माझी पोस्टिंग फॉरेन रिजनल रजिस्ट्रेशन आॅफिसर म्हणून केली असताना हे दाम्पत्य त्यांच्या व्हिसाची मुदत वाढविण्यासाठी अनेकदा आले होते. मात्र, त्यांच्याशी माझे कधीही मैत्रीपूर्ण संबंध नव्हते,’ असे भारती यांनी न्यायालयाला सांगितले.