‘त्या’ व्हिडीओप्रकरणी शीतल म्हात्रे यांचा ठाकरे गटावर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2023 05:49 AM2023-03-13T05:49:57+5:302023-03-13T05:50:37+5:30
शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा एक कथित आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : शिवसेना (शिंदे गट) प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा एक कथित आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ व्हायरल करण्यामागे ठाकरे गटाचे नेते असून या नेत्यांनी हा व्हिडीओ व्हायरल करायला सांगितल्याचा आरोप शीतल म्हात्रे यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन केला.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत बाहेर पडले तेव्हापासून मला ट्रोलिंगला सामोरे जावे लागत आहे. तरीदेखील आम्ही उत्तर दिले नाही. मात्र आता झालेल्या प्रकाराने स्त्री म्हणून वेदना होत आहेत. ज्या पद्धतीने व्हिडीओ काढून त्यावर गाणे टाकून तो मातोश्री नावाच्या फेसबुक पेजवर शेअर करण्यात आला, त्यानंतर ठाकरे गटाच्या सर्वच पदाधिकाऱ्यांच्या पेजेसवर तो व्हायरल करण्यात आला. ठाकरे गटाकडूनच हा व्हिडीओ व्हायरल करण्यास सांगण्यात आल्याचा आरोप म्हात्रे यांनी केला.
स्त्रीवर बोलायला काही नसले की, तिचे चारित्र्य हनन केले जाते. यापूर्वी घोसाळकर यांनी मला त्रास देण्याचा प्रयत्न केला. तरी मी ठाम राहिले. तेव्हा मी उद्धव ठाकरेंना याविषयी सांगितले होते. पण त्यांनी ऐकले नाही. मात्र व्हिडीओच्या घटनेनंतर पहिला फोन मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आला. तुझा भाऊ तुझ्या पाठीशी आहे, घाबरू नकोस, असे मुख्यमंत्री म्हणाल्याचेही त्यांनी सांगितले. पायाखालची वाळू सरकरल्यावर माणूस या थराला जातो. असे व्हिडीओ शेअर करून तुमचा पक्ष मोठा होणार का? हे बाळासाहेबांचे संस्कार विसरले आहेत, अशी टीकाही म्हात्रे यांनी केली. दरम्यान प्रकाश सुर्वे यांची तब्येत बरी नाही. ते माझ्याशी फोनवर बोलले आहेत. तब्येत ठीक नसल्याने ते प्रतिक्रिया देत नाहीत, असा खुलासाही त्यांनी यावेळी केला.
काँग्रेस कार्यकर्त्याला महिलांची मारहाण
समतानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये असलेल्या हनुमाननगर येथे दुर्गा मंदिर जवळ राहणारा काँग्रेसचा कार्यकर्ता राजेश गुप्ता याने संबंधित व्हिडीओचा रील बनवून ती अपलोड केल्याची माहिती मिळाल्यावर एका महिला कार्यकर्त्याने त्याला जाब विचारला. तेव्हा त्याने तिच्यावर हात उचलला आणि तिने अन्य कार्यकर्त्यांना सांगितले. त्यानंतर स्थानिकांनी त्याला मारहाण करत समतानगर पोलिसांच्या ताब्यात दिले. राजेशवर विनयभंग तसेच संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.
दोघांना अटक
व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी अटक केलेल्या आणखी दोघांची नावे अशोक मिश्रा (४५) व मानस कुवर (२६) अशी आहेत. दहिसर पोलिस ठाण्यात विनयभंग व माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्यांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"