- रतींद्र नाईक
मुंबई: महापालिकेचे रणशिंग केव्हाही फुंकले जाईल. सत्ता काबीज करण्यासाठी सर्वच पक्षांचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्यातही निवडणुकीत ठाकरे गटाला धोबीपछाड देण्यासाठी शिंदे गटाने मास्टर प्लान तयार केला आहे. ठाकरे गटातील ४० ते ५० नगरसेवक आमच्या संपर्कात असून, ते लवकरच शिंदे गटात सामील होतील, असा दावा शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी केला आहे.
मुंबईत आमचेच प्राबल्य आहे. आमची स्ट्रॅटेजी ठरली आहे. ठाकरे गटातील नगरसेवक आताच शिंदे गटात आले तर ठाकरे गटाकडे नवे उमेदवार तयार होतील. शाखाशाखांची बांधणी पूर्ण झाली आहे. लोकसभा पातळीवर बैठकाही घेण्याचे काम सुरू झाले आहे. इतकेच नव्हे तर इतर पक्षाचे नगरसेवकही गळाला लागतील, असेही शीतल म्हात्रे यांनी सांगितले.
जशास तसे उत्तर
राष्ट्रवादी आणि काँग्रेसला मिठ्या मारून त्यांच्या कार्यक्रमाला जायचे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल चांगले बोलायचे याबद्दल आमची जीभच धजावत नव्हती. पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावर बसल्यामुळे गपगुमान असे करावे लागत होते, असे शीतल म्हात्रे यांनी सांगितले.
ठाण्यातील राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात शिंदे गटाकडून अनेक कुरापती केल्या जात असल्याच्या आरोपाबाबत त्या म्हणाल्या, जितेंद्र आव्हाड यांच्याबद्दल काय बोलणार? आव्हाडांचा स्तर खालावलेला आहे. राजकारणात सर्व क्षम्य असून यापुढेही जशास तसे उत्तर दिले जाईल.