आगामी निवडणुकीत मनसेसोबत हवी; शिंदे गटाने व्यक्त केली इच्छा, युती झाली नाही तरी...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2023 12:12 PM2023-02-21T12:12:13+5:302023-02-21T14:21:42+5:30
आगामी निवडणुकीत मनसेसोबत हवी, अशी इच्छा शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी व्यक्त केली.
मुंबई : मुंबई, ठाणे महापालिका निवडणूक यंदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला अवघड जाण्याची चिन्हे आहेत. शिंदे गट आगामी निवडणुकीत मनसेशी घरोबा करण्याची शक्यता असून तशी इच्छा शिंदे गटाने व्यक्त केली आहे.
इतकेच नव्हे तर मनसेसोबत नसलो तरी एकमेकांच्या विरोधात असू नये, अशी भूमिका शिंदे गटाने घेतली आहे. मात्र, ओबीसी आरक्षण व सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अद्याप आले नसल्याने मुंबई महापालिका निवडणूक लांबली आहे. असे असले तरी आगामी निवडणुकीत मनसेसोबत हवी, अशी इच्छा शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी व्यक्त केली.
पुढच्या काळात कोणासोबत युती होईल, याबाबत अद्याप अस्पष्टता असली तरी न्यायालयाच्या निकालानंतर चित्र नेमके स्पष्ट होईल, अशी माहिती त्यांनी दिली. त्याचबरोबर ठाणे, मुंबई महापालिका या बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप युतीकडेच असणार, असा विश्वास शिंदे गटाकडून व्यक्त करण्यात आला.
कोस्टल रोड आवडीचा, मेट्रोचे काम रखडवले-
मुंबईत कोरोना काळात सर्वच कामे ठप्प झाली होती. अशात उद्धव ठाकरेंचा ड्रीम प्रोजेक्ट कोस्टल रोडचे काम मात्र सुरुच होते. या काळात मेट्रोचे काम पूर्ण व्हायला हवे होते. अडीच वर्षांपूर्वी मेट्रो धावायला हवी होती. मात्र तसे झाले नाही. काम करायचेच नाही ही उद्धव ठाकरेंची भूमिका होती. इतकेच नव्हे तर कोणाला भेटायचे नाही, कॉन्ट्रॅक्टरला आम्हीच भेटणार. कॉन्ट्रॅक्टरही आमचाच असा ठाकरे गटाचा अट्टहास होता.
भ्रष्टाचार बाहेर येईल-
कोविड काळात मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे जनतेशी संपर्क साधत होते. मात्र त्या काळात त्यांच्या मागे संपूर्ण टीम कार्यरत होती. श्रेय ते एकटेच घेत होते. या काळात झालेल्या व्यवहारांची चौकशी झाली तर भ्रष्टाचार बाहेर येईल आणि उद्भव ठाकरे गटाला तोंड दाखवायला जागा शिल्लक राहणार नाही.