मुंबई : एचडीएफसी बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ संघवी यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेला आरोपी सरफराज शेख याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. घटनेच्या २० दिवसांपूर्वी गोवंडी स्थानकाबाहेर त्याने चाकू खरेदी केला होता. तेव्हापासूनच तो सावजाच्या शोधात असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे.शुक्रवारी शेखची पोलीस कोठडी संपत असल्याने त्याला शुक्रवारी भोईवाडा न्यायालयात हजर केले गेले. पोलिसांनी न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार, ३० हजार रुपयांच्या लुटीसाठी आॅगस्ट महिन्यांपासून शेख सावजाच्या शोधात होता. गोवंडी स्थानकाबाहेरून खरेदी केलेला चाकू चाकू पोलिसांनी जप्त केला. शिवाय ज्याच्याकडून चाकू खरेदी केला, त्याच्याकडेही चौकशी केली गेली.त्यानंतर, ५ सप्टेंबर रोजी दीड वाजता त्याने कमला मिलमध्ये प्रवेश करत पार्किंग लॉटमध्ये तळ ठोकला. पोलिसांना मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो कमला मिलच्या आवारात फिरत असल्याचे दिसते आहे. रात्री ८च्या सुमारास संघवींनी कारमध्ये बसण्यासाठी स्वयंचलित लॉकने दरवाजा उघडला. ते गाडीमध्ये बसताच, त्यांच्या मागोमाग शेख मागच्या सीटवर बसला. संघवीच्या गळ्याभोवती चाकू धरत त्याने पैशांची मागणी केली. मात्र, त्यांनी नकार देत, ओरडण्यास सुरुवात केली. तेव्हा शेखने चाकूने त्यांच्या गळ्याभोवती वार केला. ते रक्ताच्या थारोळ्यात तडफडताच, तो गाडीतून उतरला. त्यांना पुढच्या सीटवरून मागच्या सीटवर टाकले. त्यांच्यावर तब्बल ७ वार केले. यामध्ये त्यांच्या मानेवर, पोटावर, काखेत, गुडघ्यावर सपासप वार केले. संघवींचा मृत्यू झाल्याची खात्री पटताच, त्यांना मागच्या सीटच्या खाली लपविले आणि तो पुढच्या सीटवर जाऊन बसला. त्यानंतर, ३ तास तो मृतदेहासोबत होता.तेथून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी कल्याणच्या हाजीमलंगची निवड केली. शेखचे हाजीमलंगला नेहमीचे जाणे होते. त्यामुळे त्याला तेथील निर्जन रस्त्यांची माहिती होती. तेथे विल्हेवाट करून त्याने गाडी कोपरखैरणे येथे पार्क केली. वाशी नाका टोल नाक्यावरून रात्री १२ वाजून १० मिनिटाने त्याची गाडी जाताना दिसत असल्याचे फुटेजही पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले.>हत्येनंतरही जीम आणि व्हॉलीबॉलचा दिनक्रमसिद्धार्थच्या हत्येनंतर शेखने घर गाठले. रक्ताने माखलेले कपडे धुऊन झोपण्याचा प्रयत्न केला. कुणाला संशय येऊ नये, म्हणून दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे जीमला गेला. मित्रांसोबत व्हॉलीबॉल खेळून तो घरी परतल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली. दुपारी ४ वाजता गाडीकडे गेला. मात्र, लांबूनच गाडीकडे पोलीस उभे असल्याचे पाहून त्याची बोबडी वळली. भीतीने त्याने स्वत:ला घरात कोंडून घेतले. ७ तारखेला संघवींचा मोबाइलचा पासवर्ड उघडण्यासाठी मनीष मार्केट गाठले. तेथे मोबाइल पासवर्ड उघडल्यानंतर तो पुन्हा घरी आला. ८ तारखेला मित्राकडून मोबाइल आॅन होताच, तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला. ८ तारखेला नवी मुंबई पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्या घरातून संघवी यांचे पॅन कार्ड, डेबिट आणि क्रेडिट कार्डही पोलिसांनी जप्त केले आहेत, तसेच शेखचे कपडेही ताब्यात घेत डीएनएसाठी पाठविण्यात आले आहेत. आतापर्यंत तपासात शेखचा जबाब आणि जप्त केलेल्या पुराव्यांवरून लुटीच्या उद्देशानेच संघवी यांची हत्या झाल्याचा अंदाजावर पोलिसांकडून शिक्कामोर्तब करण्यात येत आहे.
शेख 20 दिवसांपासून होता सावजाच्या शोधात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 6:11 AM