Jayant Patil News: विधान परिषदेच्या ११ पैकी ९ जागा जिंकून भाजप-शिंदेसेना-अजित पवार गट या महायुतीने दणदणीत विजय मिळवत महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला. महाविकास आघाडीचे शरद पवार गट समर्थित उमेदवार शेकापचे जयंत पाटील यांचा पराभव झाला. भाजपचे ५, शिंदेसेनेचे २, अजित पवार गटाचे २ असे महायुतीचे नऊ उमेदवार जिंकले. काँग्रेसच्या प्रज्ञा सातव आणि उद्धवसेनेचे मिलिंद नार्वेकर विजयी झाले. यामध्ये काँग्रेसची सात मते फुटल्याचे सांगितले जात आहे. याच पार्श्वभूमीवर बोलताना शेकापचे जयंत पाटील यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची सगळी मते आपल्याला मिळाली नसल्याचा दावा केला आहे.
पत्रकारांशी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, शरद पवार यांची प्रकृती बरी नाही. ते कोणाचे फोनही घेत नाहीत, असे सांगत आहेत. त्यामुळे न भेटताच परत आलो. पराभवाचे आत्मचिंतन करत आहे. महाराष्ट्रात या पद्धतीचे राजकारण आधी नव्हते. थोडेफार इकडे-तिकडे व्हायचे. आधीही निवडणुका लढवल्या तेव्हा अशी स्थिती नव्हती. हे असे घडत असेल तर जनतेने दोन्ही सभागृहे कोण ताब्यात घेईल याचा विचार करण्याची वेळ आली आहे, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीची सगळी मते मिळाली नाहीत
राष्ट्रवादीच्या १२ मतांवर उभा होतो. त्यातील एक मत फुटले. आमचीही मते फुटली. चार मते मिळाली असती, तर दुसऱ्या पसंतीच्या मोजणीत २५ ते ३० मते आणखी घेऊन निवडून आलो असतो. तेच गणित होते. शरद पवार गटाची पूर्ण १२ मते आपल्याला मिळाली नसल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. काँग्रेसने दुसऱ्या पसंतीची मते समान वाटली असती किंवा जर पहिल्या पसंतीची काही मते दिली असती तर निकाल बरोबर लागला असता. आता मलाही याचा अभ्यास करावा लागेल, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, शेकापचे नेते जयंत पाटील यांना शरद पवार यांनी पाठिंबा दिला होता. शरद पवार यांच्यासोबत १२ आमदार आहेत. जयंत पाटील यांना १२ मते मिळाली. शेकापचे एक आमदार, लहान पक्ष व अपक्षांची किमान सहा मते त्यांनी जुळविलेली होती. त्यामुळे शरद पवार गटाची मतेही फुटल्याची जोरदार चर्चा होती.