महागाई, भ्रष्टाचार व शिक्षण क्षेत्रातील अनागोंदी कारभाराविरोधात आज शेकापचा मोर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2018 03:08 AM2018-09-05T03:08:04+5:302018-09-05T03:08:40+5:30
भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या मुंबई प्रदेशतर्फे महागाई, भ्रष्टाचार व शिक्षण क्षेत्रातील अनागोंदी कारभाराविरोधात बुधवारी, ५ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता धडक मोर्चाची हाक देण्यात आली आहे.
मुंबई : भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या मुंबई प्रदेशतर्फे महागाई, भ्रष्टाचार व शिक्षण क्षेत्रातील अनागोंदी कारभाराविरोधात बुधवारी, ५ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता धडक मोर्चाची हाक देण्यात आली आहे. माहिमच्या शेकाप भवनपासून सुरू होणारा हा मोर्चा मुंबई उपनगराच्या वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारने जनतेला महागाई कमी करण्याचे, स्वच्छ कारभाराचे आणि शिक्षण क्षेत्रातील अनागोंदी कारभार संपुष्टात आणण्याचे आश्वासन दिले होते. मात्र या सर्व आश्वासनांची पूर्तता करण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप शेकापने केला आहे. याउलट राज्यासह देशात महागाई आणि भ्रष्टाचार बेसुमार वाढला आहे. या परिस्थितीचा निषेध व्यक्त करण्यासाठी शेकापने आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनाचे नेतृत्व आमदार जयंत पाटील, आमदार बाळाराम पाटील, अॅड. राजेंद्र कोरडे हे करणार आहेत.