मुंबई - राज्यातील राजकीय नाट्याचा आज द एन्ड झालाय, असे म्हणता येईल. तीन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिलाय. त्यामुळे राज्याच्या राजकारणात आणखी एक भूकंप पाहायला मिळाला. तत्पूर्वी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी 'आम्ही 162' म्हणत शपथविधी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे जवळपास सर्वच आमदार उपस्थित होते. तरीही, भाजपा नेते आशिष शेलार, खासदार नारायण राणे आणि आमदार रवि राणा यांनी भाजपा बहुमत सिद्ध करेल, असा विश्वास व्यक्त केला होता. मात्र, या तिन्ही नेत्यांचा आज 'पचका' झाला आहे.
आशिष शेलारांची टीकाराज्यातील सत्तास्थापनेच्या संघर्षात महाविकासआघाडीच्या आमदारांना एकत्र करत पक्षाची निष्ठा बाळगेन अशाप्रकारची शपथ देण्यात आली मात्र या ओळख परेड कार्यक्रमावर भाजपा नेते आशिष शेलार यांनी जोरदार टीका केली आहे. ओळख परेड आरोपींची केली जाते आणि आपल्याच आमदारांना आरोपी समजणं हा आमदारांचा, लोकशाहीचा अन् मतदारांचा अपमान आहे अशी टीका त्यांनी केली. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी आत्मविश्वास गमावला आहे, उपस्थित आमदारांची संख्या 145 तरी होते का, असा सवाल उपस्थित करत भाजपाच बहुमत सिद्ध करेल, असा दावाही शेलार यांनी केला होता.
नारायण राणेंची प्रतिक्रियाभाजपा नेते खासदार नारायण राणेंनीही आम्ही 162 या शपथविधी सोहळ्याची खिल्ली उडवत शिवसेनेवर टीका केली. राज्यातील सत्तासंघर्षात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांनी ग्रँड हयात हॉटेलमध्ये एकत्र येत शपथ घेतली. संविधानाला साक्ष घेऊन आमदारांनी पक्षाविरोधात कोणतंही कृत्य करणार नाही अशी शपथ घेतली. यावेळी तिन्ही पक्ष आणि मित्रपक्षाचे मिळून 162 आमदार उपस्थित होते, असे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय. पण, ग्रँड हयात हॉटेलमध्ये फक्त 130 आमदार होते असा दावा आता भाजपा नेते नारायण राणे यांनी केला. त्यांच्या हातात आमदारच नाहीत, असाही आरोप नारायण राणेंनी केला. ग्रँड हयात या हॉटेलमध्ये 162 आमदार नव्हते तर 130 आमदारच उपस्थित होते, असा दावा केलाय. जे आमदार आले नाहीत त्यातला सगळ्यात मोठा खड्डा शिवसेनेला पडला आहे. तर, या शपथविधीला काहीच अर्थ नाही, उद्धव ठाकरे रोजच घरात शपथ घेतात, मातोश्रीवर दररोज त्यांचा शपथविधी पार पडतो, असे म्हणत शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर नारायण राणेंनी जबरी टीका केली. तसेच, भाजपाच बहुमत सिद्ध करेल, असा दावाही केला होता.
रवि राणांचा विश्वासराज्यातील राजकीय घडामोडीवर युवा स्वाभिमान पक्षाचे नेते आणि आमदार रवि राणा यांनी मोठं विधान केलं होतं. भाजपाचेच सरकार स्थापन होईल आणि जवळपास 170 आमदारांच्या पाठिंब्यावर हे सरकार बहुमत चाचणीत यशस्वी होईल, असा दावाही रवि राणा यांनी केलाय. रवि राणा यांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा राजकीय घडामोडींमध्ये ट्विस्ट पहायला मिळला होतं. खासदार नवनीत राणा कौर यांच्याप्रमाणेच राज्यात भाजपाचे स्थिर सरकार स्थापन होईल, असे रवि राणा यांनी म्हटले होते. तसेच, सत्तास्थापनेला वेळ लागला तरी महाराष्ट्राला चांगले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मिळाले आहेत. भाजपासोबत 175 पेक्षा अधिक आमदार आहेत. सध्या शिवसेनेतील घडामोडीमुळे ही संख्या आणखीन वाढेल, असा आशावादही राणा यांनी बोलून दाखवला होता.
भाजपा नेते आशिष शेलार, खासदार नारायण राणे आणि आमदार रवि राणा यांचा आत्मविश्वास फोल ठरला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा दिल्यामुळे या तिन्ही नेत्यांचा पोपटच झाला आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण, महाविकास आघाडीच्या 'आम्ही 162' शपथविधी सोहळ्यानंतरही हे तिन्ही नेते आत्मविश्वासाने विश्वासदर्शक ठराव मांडणार असल्याचे सांगत होते. पण, आता भाजपा विश्वासदर्शक ठराव मांडणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.