लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सर्वसामान्य मुंबईकरांना महानगर क्षेत्रातच परवडणारी घरे मिळावीत, म्हणूनच निवारा अभियानाने आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनाच्या मोर्चेबांधणीस सुरुवात झाली असून, अधिकाधिक मुंबईकरांनी त्यात सामील होण्याचे आवाहन अभियानाचे कार्याध्यक्ष विश्वास उटगी यांनी केले आहे.उटगी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड या परिसरात परवडणारी घरे उपलब्ध व्हावीत, म्हणून या आंदोलनाची बांधणी सुरू केली आहे. त्याला आता व्यापक रूप येऊ लागले आहे. सर्वसामान्य माणूस संघटितपणे लढला, तरच कायद्याने त्याला हक्काचे घर मिळू शकते. सरकारने यूएलसी अॅक्ट २००६ मध्ये रिपील केला. मात्र, सरकारने त्या अंतर्गत किती हजार एकर जमीन ताब्यात घेतली, याचे आकडे कुठेच उपलब्ध नाहीत. आजघडीला उच्च न्यायालयाकडून राज्य सरकारचे वस्त्रहरण केले जात आहे. परवडणाऱ्या घरांसाठी ही जमीन वापरावी, असे कायदा सांगतो. त्यासाठी सुमारे १ लाख ४० हजार नागरिकांचे अर्जही सरकारला जमा केले आहेत. आता तो हक्क सरकार देत नसल्याने, तो मिळविण्यासाठी जनआंदोलन उभारत असल्याचे उटगी यांनी सांगितले. या आंदोलनाच्या तयारीसाठी दादर पूर्वेकडील आंध्र महासभा सभागृहात शनिवारी, २२ जुलै रोजी सायंकाळी ४ ते ७ वाजेदरम्यान पहिली जाहीर सभा होणार आहे. या सभेत सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून, सर्वसामान्यांच्या हक्काच्या घराच्या लढाईत सामील व्हावे, असे आवाहन संघटनेने केले आहे.
परवडणाऱ्या घरांसाठी निवारा अभियानाची मोर्चेबांधणी
By admin | Published: July 17, 2017 1:43 AM