लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पोर्नोग्राफी रॅकेटप्रकरणी सध्या सुरू असलेल्या तपासात आपल्यालाही अटक होईल, या भीतीने अभिनेत्री शर्लिन चोप्रा हिने केलेला अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई सत्रन्यायालयाने बुधवारी फेटाळला.
राज कुंद्रा याची १४ दिवस न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली असताना, दुसरीकडे मुंबई पोलिसांनी शर्लिन चोप्रा हिचा जबाब नोंदविला. एप्रिल २०२१ मध्ये शर्लिन हिने राजविरोधात लैंगिक शोषणाची तक्रार केली. यासंदर्भात राज याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
शर्लिन हिने तिच्या तक्रारीत म्हटले आहे की, २०१९ च्या सुरुवातीला आणि २७ मार्च २०१९ रोजी या व्यवसायासंदर्भात एक बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत दोघांमध्ये वाद झाल्याने राज तिच्या घरी न सांगताच आला. घरी आल्यावर राजने जबरदस्तीने तिचे चुंबन घेतले. आपल्याला विवाहित पुरुषाच्या प्रेमात पडायचे नाही, असे म्हणत तिने राजला साफ नकार दिला. त्यावर राजने शिल्पा व त्याच्यातील नाते गुंतागुंतीचे असल्याचे तिला सांगितले.
या सर्वप्रकरणी आपल्याला अटक होण्याची भीती असल्याने चोप्रा हिने सत्रन्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला. मात्र न्यायालयाने तिला दिलासा देण्यास नकार दिला.