मुंबई : रविवारी पहाटे चेंबुर व विक्रोळी येथे झालेल्या दुर्घटनेत सुमारे ३१ निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेसाठी जबाबदार असणाऱ्या दोषी व्यक्तींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी सोमवारी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने चेंबूरच्या उमरशी बाप्पा चौक येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. दुपारी २ वाजता आंदोलकांनी चेंबूर येथील सायन-पनवेल महामार्ग रोखून धरला होता. यावेळी पालिका प्रशासन व राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी आंदोलक रस्त्यावरून बाजूला होत नसल्याचे पाहून पोलिसांनी आंदोलकांना बाजूला सारण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी आंदोलक व पोलिसांमध्ये झटापट झाली. त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते. आंदोलकांना रस्त्यावरून बाजूला सारल्या नंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
पावसामुळे चेंबूर व विक्रोळी येथील ३१ लोकांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे त्यांचे संसार उघड्यावर पडले आहेत. पालिका प्रशासन आणि राज्य सरकारचा गलथान कारभार याला जबाबदार आहे. त्यामुळे दोषी अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्याविरुद्ध कारवाई करायला हवी. तसेच दुर्घटनाग्रस्त नागरिकांचे पुनर्वसन केले जावे अशी मागणी यावेळी शेकापचे दीपक कांबळे यांनी केली.