शेवते यांनी इतर भाषांमध्येही लिहावे
By admin | Published: February 24, 2016 03:22 AM2016-02-24T03:22:26+5:302016-02-24T03:22:26+5:30
जेव्हा कवी स्वत:चे दु:ख व्यक्त करतो तेव्हा त्यातून समाजाचे दु:ख व्यक्त झाले, तरच कवीचे आकाश मोठे होते. शेवते यांच्या या कवितेतील त्यांच्या मुलीबद्दलच्या भावना या समाजाच्या
मुंबई : जेव्हा कवी स्वत:चे दु:ख व्यक्त करतो तेव्हा त्यातून समाजाचे दु:ख व्यक्त झाले, तरच कवीचे आकाश मोठे होते. शेवते यांच्या या कवितेतील त्यांच्या मुलीबद्दलच्या भावना या समाजाच्या भावना आहेत. या कविता वाचताना शेवतेंमध्ये दडलेली आई वाचकांना भेटते. साहित्याचे आदान-प्रदान झाले पाहिजे. अरुण शेवते यांनी इतर भाषांमध्येही लिहावे, अशी अपेक्षा ज्येष्ठ गीतकार गुलजार यांनी व्यक्त केली.
अरुण शेवते लिखित ‘शर्वरीच्या कविता’ या काव्यसंग्रहाचे गुलजार यांच्या हस्ते पु. ल. देशपांडे अकादमीच्या मिनी थिएटरमध्ये प्रकाशन झाले. यावेळी माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, यशवंतराव गडाख, अभिनेत्री अमृता सुभाष, पी.डी. पाटील, सचिन इटकर आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी ८९ व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष पी.डी. पाटील आणि समन्वयक सचिन इटकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. ‘आज कवी असणारा माझा बाबा जिंकला. माझे भाग्य आहे की, मला असा बाबा लाभला त्यांच्यात आई दडलेली आहे,’ अशी भावना शर्वरीने व्यक्त केली.
‘शेवतेंच्या कविता वाचताना माझ्या मुलींची आठवण आली. बापाचे प्रेम, दर्द, करुणा, चलबिचल आदी सर्व भाव या कवितेत अनुभवण्यास मिळतात. या कविता नेहरूंनी इंदिरा गांधींना लिहिलेल्या पत्रांची आठवण करून देतात,’ अशा भावना सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केल्या.
बाप आणि मुलीचे आदिम नाते आहे. शेवते यांच्या कवितांतून मला माझे बाबा पुन्हा एकदा भेटले , अशा भावना अमृताने व्यक्त केल्या. शेवते यांच्या कवितांतून स्वत:च्या वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला. ‘मी जगात नसताना’ या कवितेत म्हटल्याप्रमाणे ‘अंगणातील फुले बाप नसताना त्या मुलींशी बोलती होतील, ती त्यांच्याशी संवाद साधेल.’ तसेच या कविता अनेकांना फुलांचे बोलणे ऐकायला शिकवतील, असा दिलासा अमृताने दिला. (प्रतिनिधी)