पेट्रोल पंपांची शनिवारी एक शिफ्ट बंद !
By admin | Published: April 9, 2015 05:00 AM2015-04-09T05:00:07+5:302015-04-09T05:00:07+5:30
केंद्र शासन आणि तेल कंपन्यांकडून पेट्रोलपंप चालकांच्या विविध मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्यााकारणास्तव राष्ट्रीय पातळीवरील पेट्रोल
मुंबई : केंद्र शासन आणि तेल कंपन्यांकडून पेट्रोलपंप चालकांच्या विविध मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्यााकारणास्तव राष्ट्रीय पातळीवरील पेट्रोल डिलर्स संघटनेने काम बंद आंदोलनाची हाक दिली आहे. त्यासाठी ११ एप्रिलला राज्यातील सर्व पेट्रोलपंपांची एक शिफ्ट बंद ठेवण्यात येणार आहे. शिवाय लवकरच मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर बेमुदत बंदची हाक देणार असल्याचे संघटनेने सांगितले.
राज्यातील प्रमुख शहरांमध्ये २४ तास पेट्रोलपंप सुरू असतात. शहरी भागात पेट्रोलपंपावर तीन शिफ्टमध्ये, तर हायवेला दोन शिफ्टमध्ये काम चालते. परिणामी शहरी भागात ८ तास आणि हायवे परिसरात १२ तास पेट्रोलपंप बंद ठेवणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष उदय लोध यांनी दिली. लोध म्हणाले की, राज्यातील ४ हजार ५०० पेट्रोलपंप चालक या संपात सामील होणार आहेत. जनजीवन पूर्णपणे स्तब्ध होऊ नये, म्हणून संपूर्ण दिवस बंद ठेवणार नाही. तरी शहरांमध्ये सकाळी वर्दळीच्या वेळी आणि शहराबाहेरील हायवेंवर रात्री गरजेच्या वेळी पेट्रोलपंप बंद असतील. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होणार असून त्याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची असेल.
डिलर्स प्रत्येक महिन्याला किमान १७० किलो प्रती आउटलेटची विक्री करतो, असे गृहीत धरून शासन डिलर्सचे मार्जिन ठरवते. मात्र प्रत्यक्षात देशातील ५३ हजार डिलर्सपैकी ७५ टक्के पंपांवरून १७० किलो पेक्षा कमी विक्री होत असल्याचा दावा संघटनेने केला आहे. त्यामुळे मार्जिन ठरवताना ते विक्रीनुसार ठरवण्याची संघटनेची मागणी आहे. शिवाय पंपावरील सर्व सेवा सशुल्क करण्याची मागणीही संघटनेने केली आहे. (प्रतिनिधी)