Join us

मेट्रो कारशेड आरेमध्येच राहणार?; समितीने सोपवला मुख्यमंत्र्यांना अंतिम अहवाल 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2020 11:47 AM

२०१५ मध्ये आरेमध्ये मेट्रो कारशेड आणण्याचा प्रस्ताव आला होता. त्यानंतर पर्यावरणप्रेमी आणि मुंबई मेट्रो रेल अधिकाऱ्यांमध्ये अनेक वाद रंगले होते.

मुंबई - बहुचर्चित आरेमधीलमेट्रो कारशेडच्या कामाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थगिती दिली होती. या कारशेडबाबत अभ्यास करण्यासाठी ४ जणांची समिती मागील महिन्यात नेमण्यात आली होती. आरेमधूनमेट्रो कारशेड अन्य ठिकाणी नेता येईल का? याबाबत ही समिती सरकारला अहवाल सादर करणार होती. यासाठी अर्थ खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी मंगळवारी समितीचा अंतिम अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला आहे. 

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार या समितीने आरेमधील मेट्रो कारशेड अन्य ठिकाणी घेऊन जाणं व्यवहार्य होणार नाही अशी शिफारस दिली असल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे. आरेमधून मेट्रो कारशेड दुसऱ्या ठिकाणी बनविण्यात यावं अशी मागणी पर्यावरणप्रेमींकडून केली जात होती. मात्र समितीने दिलेल्या शिफारशीनुसार जर कारशेड अन्य ठिकाणी नेलं तर या प्रकल्पाचा खर्च, अनेक तांत्रिक बाबी वाढतील, तसेच मेट्रोच्या कामाला विलंबदेखील होईल त्यामुळे आरेमध्ये कारशेड राहणं योग्य आहे असं सांगण्यात आलं आहे.  

आरेमधील मेट्रो कारशेडचं कामकाज सुरु ठेऊन राज्य सरकारने आरे वसाहतीच्या अंतर्गत ज्या जागेवर हिरवा पट्टा आहे त्याला जंगल म्हणून संरक्षण करता येईल अशी शिफारस केली आहे. २०१५ मध्ये आरेमध्ये मेट्रो कारशेड आणण्याचा प्रस्ताव आला होता. त्यानंतर पर्यावरणप्रेमी आणि मुंबई मेट्रो रेल अधिकाऱ्यांमध्ये अनेक वाद रंगले होते. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर 4 ऑक्टोबर 2019 रोजी एका रात्रीत मेट्रो कारशेडच्या ३३ हेक्टर जागेवरील 2,141 झाडे तोडण्यात आली.

प्रधान सचिव (पर्यावरण) अनिल दिग्गीकर, व्यवस्थापकीय संचालक (मुंबई रेल्वे विकास महामंडळ) आर एस खुराना आणि मुख्य वनसंरक्षक (संजय गांधी राष्ट्रीय उद्यान) अन्वर अहमद यांचाही या चार जणांच्या समितीमध्ये समावेश होता.  या समितीला मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागेचा शोध घेणे, झाडे तोडण्यापूर्वी सर्व परवानग्या घेतल्या आहेत का याची तपासणी करणे आणि आरेतील झाडांचे संरक्षण आणि जतन करणे याचा अहवाल देण्यासाठी सांगितले होते. 

सूत्रांनी सांगितल्यानुसार, पॅनलने दोन पर्यायी जागांचा विचार केला होता. कांजूरमार्ग येथील दलदलीसारखी जमीन ज्याठिकाणाहून जोगेश्वरी-लोखंडवाला-विक्रोळी-कांजूरमार्ग अशी आणखी एक मेट्रो लाईन प्रस्तावित आहे आणि आरे कॉलनीच्या बाहेर सारीपात नगर येथे एक जागा आहे. त्याठिकाणी राज्य राखीव पोलिस दल, निवासी परिसर आणि कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्याची सोय आहे. त्यामुळे या दोन्ही जागेवर कारशेड बनवणं संभाव्य होणार नाही. 

मेट्रो कारशेड समितीने अंतिम अहवाल दिला आहे. आरेमध्ये कारशेड बनवण्याची शिफारस समितीने दिली आहे. गेल्या ६० दिवसांपासून स्थगिती दिल्याने जवळपास ६०० कोटींचे नुकसान झाल्याचा आरोप भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आरेमधील कारशेडला दिलेली स्थगिती उठवावी, तातडीने कामाला सुरुवात करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणीही त्यांनी केली आहे. 

टॅग्स :आरेमेट्रोपर्यावरणउद्धव ठाकरेभाजपा