Join us

नवी मुंबईत सीमोल्लंघनासाठी शेकाप आतूर

By admin | Published: February 28, 2015 1:43 AM

शेजारच्या रायगड जिल्ह्यात प्राबल्य असलेल्या शेतकरी कामगार पक्षाने (शेकाप) आगामी महापालिका निवडणुकीत उतरण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे.

कमलाकर कांबळे, नवी मुंबईशेजारच्या रायगड जिल्ह्यात प्राबल्य असलेल्या शेतकरी कामगार पक्षाने (शेकाप) आगामी महापालिका निवडणुकीत उतरण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे. विशेष म्हणजे महापालिकेच्या दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत म्हणजेच पंधरा वर्षांपूर्वी शेकापने प्रयत्न केला होता. शहरातील नव्या राजकीय समीकरणाच्या पार्श्वभूमीवर शेकापने पुन्हा एकदा जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.शेकापचा बालेकिल्ला म्हणून रायगड जिल्ह्याकडे पाहिले जाते. शेजारच्या उरण, पनवेलसह नवी मुंबईच्या प्रवेशद्वारावर असलेल्या खारघर नोडपर्यंत शेकापचा विस्तार झाला आहे. नवी मुंबईत मात्र त्यांना अद्यापि प्रवेश करता आलेला नाही.२000 सालच्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शेकापने ३२ ठिकाणी उमेदवार उभे केले. त्यापैकी नेरूळ येथील अंकुश ठाकूर हा एकमेव उमेदवार निवडून आला होता. तर सहा ठिकाणी शेकापचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते. पहिल्याच प्रयत्नात नवी मुंबईच्या राजकारणात झालेल्या चंचूप्रवेशानंतर शेकाप आपला विस्तार करील, अशी अपेक्षा होती. मात्र वरिष्ठ नेतृत्वाने पक्ष विस्ताराकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे पंधरा वर्षांपूर्वी एका नगरसेवकाच्या माध्यमातून सायबर सिटीत रुजलेली शेकापची मुळे पुरती कोमेजली. असे असले तरी आता पुन्हा एकदा नव्या जोमाने सीमोल्लंघन करण्यासाठी शेकाप आतूर झाला आहे.माजी मंत्री गणेश नाईक यांची मागील दोन दशकांपासून या शहरावर एकहाती सत्ता आहे. नाईक यांच्या बेरजेच्या राजकारणामुळे कोणत्याही राजकीय पक्षाला येते मूळ धरता आले नाही. मात्र अलीकडेच झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत नाईक यांच्या विकासाभिमुख राजकारणाला नाकारत मतदारांनी बदलाच्या दिशेने कौल दिला. बदललेल्या या नव्या राजकीय समीकरणाचा लाभ उठवण्याचा निर्णय शेकाप नेतृत्वाने घेतला आहे. त्यानुसार विविध पक्षांतील असंतुष्टांची मोट बांधण्याची तयारी शेकापने चालविली आहे. शेकापच्या या राजनीतीचा पहिला फटका राष्ट्रवादीला बसला आहे. राष्ट्रवादीचे कविता जाधव व भरत जाधव हे आजी-माजी नगरसेवक शेकापच्या गळाला लागले आहेत. शेकापचे नेते तथा माजी आमदार विवेक पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जाधव दाम्पत्य आपल्या समर्थक कार्यकर्त्यांसह उद्या लाल बावटा हातात घेणार आहेत.