Join us

...आणि शिखा यांच्यावरील फुप्फुसाचे प्रत्यारोपण टळले, अंधेरीतील रुग्णालयात झाली दुर्मीळ शस्त्रक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2022 7:20 AM

शिखा गिरधरवाल... वय अवघे ३६ वर्षे... मात्र, त्यांना इडिओपॅथिक पल्मोनरी आर्टेरियल हायपरटेन्शन (आयपीएएच) या फुप्फुसाच्या दुर्मीळ विकाराने ग्रासले.

मुंबई :

शिखा गिरधरवाल... वय अवघे ३६ वर्षे... मात्र, त्यांना इडिओपॅथिक पल्मोनरी आर्टेरियल हायपरटेन्शन (आयपीएएच) या फुप्फुसाच्या दुर्मीळ विकाराने ग्रासले. औषधोपचार सुरू होते; परंतु आजाराची लक्षणे बळावत होती. बेशुद्ध पडणे आणि चक्कर येणे यांची तीव्रता वाढली; परंतु पॉट्स शंट या वैद्यकीय प्रक्रियेमुळे शिखा यांचे प्राण वाचले. विशेष म्हणजे फुप्फुस व हृदयाचे प्रत्यारोपण करण्याची वेळही त्यांच्यावर आली नाही. 

शिखा यांना सतत त्रास जाणवत होता. औषधे घेऊनही फप्प्फुसांमध्ये दाब वाढल्याचे त्यांना जाणवायचे. लक्षणे अधिकाधिक तीव्र होत होती. अंधेरी येथील खासगी रुग्णालयात शिखा यांची संपूर्ण तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांच्यावर अत्याधुनिक पॉट्स शंट शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रक्रियेमध्ये फुप्फुस व हृदयावरील दाब कमी करण्यासाठी स्टेंट टाकावा लागतो. तसेच फुप्फुसातील डावी धमनी आणि शरीरातील मुख्य धमनी (उतरणारी महाधमनी) यांच्यामध्ये रक्तप्रवाहाचा थेट मार्ग तयार केला जातो. 

सामान्यतः पॉट्स शंट ही प्रोसिजर ओपन कन्व्हेन्शनल सर्जरीमार्फत केली जाते, यामध्ये अधिक जास्त जोखीम असते. त्यात रुग्णाची तब्येत पूर्ववत होण्यासही अधिक वेळ लागतो. मिनीमली इन्व्हेसिव्ह अर्थात शरीरावर कमीत कमी चिरा देऊन ट्रान्सकॅथेटर पद्धतीमध्ये मांडीतील मुख्य रक्तवाहिनी फेमोरल धमनीचा वापर यात केला जातो, अशी माहिती डॉ. प्रशांत बोभाटे यांनी दिली. 

आव्हानात्मक प्रक्रिया पॉट्स शंट ही आव्हानात्मक शस्त्रक्रिया असून, खूप काळजीपूर्वक करावी लागते. डाव्या फुप्फुसातील धमनी आणि उतरणारी महाधमनी यांच्यामध्ये बसवण्यात येणाऱ्या स्टेंटची लांबी ठरवण्यात थोडी जरी चूक झाली तरी रक्तस्त्राव होऊन प्रक्रिया अयशस्वी होऊ शकते. शंट ज्या रक्तवाहिन्यांत निर्माण करावयाचा आहे, त्यांची तपासणी करण्यासाठी संगणकीकृत टोमोग्राफी अँजिओग्राफीसह प्रक्रिया-पूर्व नियोजन केले जाते. ही प्रक्रिया करण्यासाठी कार्डियाक ॲनेस्थेसिओलॉजीमध्ये नैपुण्य असणेही महत्त्वाचे असते. संबंधित रुग्णाच्या प्रकृतीत चांगली सुधारणा झाली असून, त्या त्यांचे सर्वसामान्य आयुष्य सुरू करण्यास सक्षम आहेत.- डॉ. प्रशांत बोभाटे, कन्सल्टंट