शिकलकर टोळीतील चोर चार सराफांसह जेरबंद
By admin | Published: January 5, 2017 04:23 AM2017-01-05T04:23:44+5:302017-01-05T04:23:44+5:30
मुंबई आणि ठाणे परिसरात घरफोड्या करणाऱ्या टक्कुसिंग टाक (शिकलकर, रा. नारंगीफाटा, विरार, पालघर) याच्यासह शिकलकर टोळीतील पाच,
ठाणे : मुंबई आणि ठाणे परिसरात घरफोड्या करणाऱ्या टक्कुसिंग टाक (शिकलकर, रा. नारंगीफाटा, विरार, पालघर) याच्यासह शिकलकर टोळीतील पाच, तसेच चार सराफ आणि अन्य टोळीतील चौघे अशा १३ जणांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या भिवंडी पथकाने जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून लुटीतील २६ लाखांच्या सोने-चांदीच्या दागिन्यांसह ५५ लाख ८४ हजारांचा ऐवजही हस्तगत केल्याची माहिती पोलीस उपायुक्त पराग मणेरे यांनी दिली. त्यांनी आतापर्यंत १२ गुन्ह्यांची कबुली दिली आहे.
विमलसिंग उर्फ राज टाक (२९, शिकलकर), विकी सिंग कलाणी उर्फ शिकलकर (२८, रामटेकडी, हडपसर, पुणे), घुंगरुसिंग तिलपिटिया उर्फ शिकलकर (४४, रा. वडोदरा, गुजरात) आणि किस्मतसिंग शिकलकर (३१, रा. धुळे) या शिकलकर टोळीसह निरव उर्फ निशीत सोनी (३४, रा. धुळे), संदीप डहाळे (३५), विक्रम गलांडे (२८), पुरुषोत्तम दंडगव्हाळ उर्फ बापूशेठ (५५, रा. चौघेही नाशिक) या चार सराफांनाही अटक केली आहे. चोरीनंतर हे टोळके नाशिकच्या या सराफांकडे दागिन्यांची विक्री करीत होते.
चोरीचा माल अल्प किमतीत घेऊन या टोळीला मदत केल्याप्रकरणी सराफांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून कापूरबावडी, मुंब्रा या भागातील चोऱ्या उघडकीस आल्या असून ७५५ ग्रॅम सोने आणि १४ किलो ७०७ ग्रॅम चांदी असा २६ लाख दोन हजार ७६७ रुपये किमतीचा ऐवज हस्तगत केला आहे.
श्रीकृष्णा पांडे (३१, वसई), ललित हरीजन (२२, वसई) आणि अजयकुमार उर्फ दुर्गाप्रसाद हरीजन (२२, वसई रोड, भिवंडी) या तिघांकडून गोदाम चोरीतील सात गुन्हे उघडकीस आले असून त्यांच्याकडून २० लाख ९४ हजार ३८९ रुपयांचा माल हस्तगत केला आहे. त्यांनी भिवंडीतील प्लॅस्टिक दाणा गोदाम फोडले होते. त्यांना नवी मुंबई भागातून अटक करण्यात आली. याशिवाय, जमील सलमानी अहमद (२३, रा. नालासोपारा) यांच्याकडून भांडुप भागातील चोरी उघडकीस आली. (प्रतिनिधी)