सर्व शिक्षा अभियानाचा ‘तो’ आदेश रद्द, विद्यार्थ्यांना मिळणार नवी पुस्तके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2018 12:55 AM2018-07-05T00:55:54+5:302018-07-05T00:56:02+5:30
सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत मिळणाऱ्या मोफत पाठ्यपुस्तकांची साठवणूक, निर्लेखन (नोंदी करून आवश्यकतेनुसार विक्री) करण्याचे काम शाळांवर सोपविण्यात आल्याचे परिपत्रक शिक्षण विभागाकडून नुकतेच काढण्यात आले होते.
मुंबई : सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत मिळणाऱ्या मोफत पाठ्यपुस्तकांची साठवणूक, निर्लेखन (नोंदी करून आवश्यकतेनुसार विक्री) करण्याचे काम शाळांवर सोपविण्यात आल्याचे परिपत्रक शिक्षण विभागाकडून नुकतेच काढण्यात आले होते. मात्र यामुळे शिक्षक, मुख्याध्यापकांवर या कामाचा अतिरिक्त भार येणार असल्याने त्यांच्यामध्ये नाराजीचा सूर होता. याबाबत ‘लोकमत’नेही वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर आता शिक्षण निरीक्षक उत्तर मुंबई यांनी हा आदेश रद्द केला आहे. त्यामुळे शाळांवरील अतिरिक्त कामाचा भार हलका होणार असून विद्यार्थ्यांनाही नवीन पुस्तके मिळतील.
१ जुलै रोजी ‘सर्व शिक्षा अभियानातील पुस्तकांचे करायचे काय?’ या मथळ्याखाली लोकमतने वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानुसार मोफत पाठ्यपुस्तकांच्या निर्लेखनासाठी ती विद्यार्थ्यांकडून जमा करून त्यांची नोंद मुख्याध्यापकांना ठेवण्यास सांगण्यात आले होते. मात्र त्यामुळे नोंदी तसेच विक्रीचा अतिरिक्त भार मुख्याध्यापक आणि शिक्षकांवरच येणार होता. हे शाळाबाह्य काम असल्याची प्रतिक्रिया मुख्याध्यापक संघटनेकडून देण्यात आली होती. याशिवाय पुस्तकांच्या साठवणुकीचा प्रश्न निर्माण होणार होता.
दरवर्षी विद्यार्थ्यांसाठी नवीन पुस्तके छापली जात असताना ती त्यांच्याकडून परत घेण्याचा उद्देश काय, असा प्रश्नही यानिमित्त उपस्थित करण्यात आला. त्यामुळे अखेर तो आदेशच शिक्षण निरीक्षक उत्तर मुंबई यांनी रद्द केला आहे.