फडणवीसांचे शिलेदार... राज्यसभा उमेदवार अजित गोपछडे कोण?; भाजपाकडून मोठी संधी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2024 04:03 PM2024-02-14T16:03:17+5:302024-02-14T16:05:46+5:30
महाराष्ट्रातील सध्याच्या समीकरणांनुसार राज्यसभेच्या एकूण ६ जागांपैकी ३ जागा भाजपाला बिनविरोध मिळतील.
मुंबई - आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून महाराष्ट्रातील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. तर, शिवसेना शिंदे गटाकडून एक अशा एकूण ४ उमेदवारांची नावे जाहीर झाली आहेत. भाजपाने नुकतेच भाजपात प्रवेश केलेले अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजित गोपछडे यांना राज्यसभेची उमेदवारी दिली. तर शिवसेना शिंदे गटाकडून मिलिंद देवरा यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे, महायुतीकडून ५ जागांवरच ही निवडणूक लढली जात असून भाजपाने तीनच उमेदवार अंतिम केले आहे. त्यामुळे, काँग्रेसला एक जागा बिनविरोध जिंकता येईल.
महाराष्ट्रातील सध्याच्या समीकरणांनुसार राज्यसभेच्या एकूण ६ जागांपैकी ३ जागा भाजपाला बिनविरोध मिळतील. महायुतीतील तिसरा पक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने अद्याप उमेदवारी जाहीर केली नसून संध्याकाळपर्यंत त्यांचाही उमेदवार घोषित होऊ शकतो. दरम्यान, भाजापाने उमेदवारी दिलेल्यांमध्ये अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी यांच्यासह डॉ. अजित गोपछडे यांना संधी दिली आहे. नुकतेच काँग्रेसमधून भाजपात आलेल्या अशोक चव्हाण यांना राज्यसभेवर संधी देण्यात आली आहे. अशोक चव्हाण यांच्यासह भाजपा नेत्या आणि आमदारकीवेळी कोथरुड मतदारसंघातील आपली हक्काची जागा मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासाठी सोडणाऱ्या मेधा कुलकर्णी यांनाही भाजपाने संधी दिली. तर, तिसऱ्या जागेसाठी देवेंद्र फडणवीसांशी जवळीक असलेल्या नांदेमधील डॉ. अजित गोपछडे यांनाही संधी मिळाली आहे.
कारसेवक ते वैद्यकीय सेवक
डॉ. अजित गोपछडे हे नांदेडचे शहरातील एमडी डॉक्टर असून, त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत काम केले आहे. त्यातून रा. स्व. संघाशीही त्यांचा जवळचा संबंध आहे. तसेच, मागच्या भाजपच्या सत्ताकाळात त्यांची तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक वाढली. त्यातच, ते लिंगायत समाजातून येत असल्याने भाजपाने नांदेडसह लातूर, धाराशिव येथील लिंगायत समाजाच्या मतदारांना आकर्षित करत 'सोशल इंजिनिअरिंग' साधले आहे. दरम्यान, राम मंदिर आंदोलनातही १९९२ साली कारसेवक म्हणून त्यांनी सहभाग घेतला होता. त्यावेळी, ते २२ वर्षांचे होते.
अजित गोपछेडे हे भाजपाच्या डॉक्टर्स आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राहिले आहेत. तसेच, नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे राज्यपाल नियुक्त सदस्यही आहेत. गतवेळी विधान परिषदेसाठीही भाजपाकडून जाहीर केलेल्या उमेदवारांमध्येही डॉ. अजित गोपछडे यांना संधी मिळाली होती. त्यामुळे, विधानपरिषद आमदार ते राज्यसभा खासदार असा त्यांचा प्रवास ठरणार आहे. राज्यसभेवर त्यांना संधी दिल्यामुळे आता त्यांची विधानपरिषदेतील जागा लवकरच रिक्त होईल.
जी २० समितीतही निवड
दरम्यान, जी-२० परिषदेच्या महाराष्ट्र भाजपच्या कार्यक्रम समितीत डॉ. अजित गोपछडे यांची नियुक्ती करण्यात आली होती. जी २० परिषदेच्या सारख्या महत्वपूर्ण समितीत आपला सहभाग करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माझ्यावर ही महत्वाची जबाबदारी सोपविली. 'संघटन, सेवाकार्य आणि संवाद' या सूत्राभोवती सलग ३५ वर्षे वैद्यकीय क्षेत्र व ३० वर्षे भाजपा कार्यकर्ता म्हणून कार्यरत असल्याने संघटनात्मक कौशल्याचा अनुभव याकामी नक्कीच उपयोगी येईल, असे डॉ. गोपछडे यांनी जी २० परिषदेतील निवडीबद्दल वरिष्ठांचे आभार मानताना म्हटले होते.