संकल्पनेच्या श्रेयासाठी शिल्पा नवलकरांची 'मानाचि'कडे धाव, नाटकाची संकल्पना चोरल्याचा आरोप

By संजय घावरे | Published: September 20, 2022 08:17 PM2022-09-20T20:17:39+5:302022-09-20T20:17:44+5:30

'सेल्फी' नाटकाची संकल्पना चोरल्याचा परितोष पेंटरवर आरोप

Shilpa Navalkar rushes to 'Manachi' for the credit of the concept, accused of stealing the concept of the play | संकल्पनेच्या श्रेयासाठी शिल्पा नवलकरांची 'मानाचि'कडे धाव, नाटकाची संकल्पना चोरल्याचा आरोप

संकल्पनेच्या श्रेयासाठी शिल्पा नवलकरांची 'मानाचि'कडे धाव, नाटकाची संकल्पना चोरल्याचा आरोप

googlenewsNext

मुंबई : अभिनेत्री-लेखिका शिल्पा नवलकर यांनी नाटकाची संकल्पना चोरल्याचा आरोप केल्याने पुन्हा एकदा लेखकांच्या श्रेयाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. लेखक-दिग्दर्शक-निर्माते परितोष पेंटर यांनी आपल्या 'सेल्फी' नाटकाची संकल्पना चोरल्याचा आरोप शिल्पा यांनी केला आहे. परितोष यांनी राजेशकुमार मोहंतीसह सात मराठी चित्रपटांची घोषणा केली. यातील 'फक्त महिलांसाठी' या चित्रपटाची संकल्पना 'सेल्फी' नाटकाची असून, माध्यमांतरासाठी आवश्यक ते बदल करून चित्रपट बनवण्यात येत असल्याचा आरोप शिल्पा यांनी सोशल मीडियावर केला.

सोशल मीडियावरील पोस्टमध्ये त्यांनी कशा प्रकारे संकल्पनेची चोरी करण्यात आली त्याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. त्यानंतर या प्रकरणाचा न्यायनिवाडा करण्यासाठी त्यांनी थेट मालिका नाटक चित्रपट लेखक संघटनेकडे (मानाचि) धाव घेतली आहे. याबाबत 'लोकमत'शी संवाद साधताना शिल्पा म्हणाल्या की, आता हे प्रकरण मानाचिकडे गेले आहे. सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर मानाचिचे माजी अध्यक्ष सचिन दरेकर आणि विद्यमान अध्यक्ष विवेक आपटे यांच्या माध्यमातून परितोष पेंटर आणि माझे कॉन कॅालवर बोलणे झाले. त्यातही मी एक गोष्ट स्पष्ट केली की, संहिता आणि संकल्पना या दोन गोष्टींची गल्लत होत आहे. 'फक्त महिलांसाठी' या चित्रपटाची संकल्पना 'सेल्फी' नाटकाचीच असल्याने केवळ संकल्पनेचे श्रेय मागत आहे.

वेगवेगळ्या वयोगटातील, विविध प्रवृत्तीच्या स्त्रिया एकत्र ट्रेन प्रवासाला निघतात. एका बंद जागेत अडकून पडतात आणि त्यानंतर घडणाऱ्या गोष्टी नाटकात होत्या. त्या गोष्टी नाटकात घडणाऱ्या वेगळ्या असतील आणि चित्रपटात घडणाऱ्या वेगळ्या असतील, पण संकल्पना तीच राहिल. मला फक्त श्रेय हवे होते. मानधनही नको होते, पण मानाचिकडे गेल्यावर मूळ संकल्पना असलेल्या लेखकाला श्रेय आणि मानधन मिळाले, तर योग्य पायंडा पडेल ही त्यांची गोष्ट पटली.

त्यानंतर शिल्पा नवलकर लिखित 'सेल्फी' या नाटकाच्या संकल्पनेवर आधारित... इतकेच श्रेय आणि मानाचि ठरवेल त्या उचित मानधनाची मागणी परितोष यांच्याकडे केली आहे. याविषयी दोन दिवसांत निर्णय घेणार असल्याचे परितोष यांनी सांगितले. श्रेय आणि उचित मानधन मिळाल्यावर 'फक्त महिलांसाठी' या चित्रपटासोबतच परितोष आणि दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी यांना शुभेच्छा देईन असेही शिल्पा म्हणाल्या. या प्रकरणावर प्रकाश टाकण्यासाठी परितोष यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
..........................
- मृणाल कुलकर्णी (अभिनेत्री, दिग्दर्शिका)
'सेल्फी' हे चांगले आणि मला खूप आवडलेले नाटक आहे, पण या नाटकाचा 'फक्त महिलांसाठी' या चित्रपटाच्या पटकथेशी अर्थाअर्थी काहीही संबंध नाही. नाटक आणि चित्रपट अशा दोन्ही स्क्रीप्ट जाणकारांसमोर ठेवल्यावर त्यांना हे समजेलच. चित्रपटाचे स्क्रीप्ट संपूर्णत: वेगळे आहे. याचे शूटिंग युकेमध्ये होणार असल्याने शूटिंगला अद्याप वेळ आहे.

Web Title: Shilpa Navalkar rushes to 'Manachi' for the credit of the concept, accused of stealing the concept of the play

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई