शिल्पाचा जबाबाचाही आरोपपत्रात समावेश
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती व उद्योगपती राज कुंद्रा याच्यासह चौघा जणांविरोधात पॉर्नोग्राफीप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने बुधवारी १४६७ पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे. यामध्ये शिल्पा शेट्टीसह ४३ जण साक्षीदारांच्या यादीत आहेत. ‘कामात व्यस्त असल्याने राज काय करतो माहीत नाही’, असा जबाब अभिनेत्री शिल्पा शेट्टीने पोलिसांना दिला आहे.
शिल्पाच्या साक्षीनुसार, राज कुंद्रा याने २०१५ मध्ये “विआन इंडस्ट्रीज लि.’नावाची कंपनी सुरू केली होती. त्या कंपनीमध्ये शिल्पा शेट्टीचे २४.५० टक्के समभाग होते. या कंपनीत शिल्पा एप्रिल २०१५ ते जुलै २०२० या कालावधीत संचालक पदावर होती. त्यानंतर वैयक्तिक कारणास्तव संचालकपदाचा राजीनामा दिला असल्याचे सांगितले. हॉटशॉट ॲप व बॉलिफेम यासंदर्भात आपल्याला काही माहिती नाही. कामात व्यस्त असल्याने पती राज कुंद्रा काय करतो, त्यांना माहिती नसल्याचे शिल्पाने जबाबात नमूद केले आहे. आतापर्यंत एकूण ११ आरोपीना अटक करण्यात आली असून, १३ जणांविरुद्ध ४ हजार ९९६ पानांचे दोषारोप पत्र दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी मालमत्ता कक्षाकडून अधिक तपास सुरू आहे.
राज कुंद्राच मुख्य सूत्रधार
दोषारोप पत्रात, पॉर्नोग्राफी प्रकरणाचा कुंद्राच मुख्य सूत्रधार असल्याबाबतचा ठपका ठेवण्यात आला आहे. कुंद्राने २०१९ मध्ये आर्म्स प्राईम मीडिया नावाने कंपनी स्थापन केली. या कंपनीच्या माध्यमातून पॉर्न चित्रफिती प्रसारणासाठी तयार केलेले हॉटशॉट्स नावाचे अप्लिकेशन लंडनस्थित केनरीन कंपनीला विकले. हाती लागलेल्या पुराव्यामध्ये कुंद्राच सर्व व्यवहार हाताळत असल्याचे दिसून आले होते. यासंबंधित व्हॉट्सॲप चॅट, ईमेल्सही पुरावे म्हणून जोडले आहेत. त्यानुसार, याप्रकरणी मालमत्ता कक्ष अधिक तपास करीत आहेत.
....