लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : बिटकॉइन घोटाळ्यासंदर्भात मनी लाँड्रिंग गुन्ह्यातील सहभागाच्या आरोपांवरून मुंबईतील जुहू येथील राहते घर आणि पुण्यातील फार्म हाऊस रिक्त करण्याच्या ईडीच्या नोटिशीला अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. न्यायालयाने ईडीला नोटीस बजावत गुरुवारी सुनावणी ठेवली आहे.
या याचिकेवरील सुनावणी न्या. रेवती मोहिते डेरे व न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठापुढे होती. शिल्पा आणि राज कुंद्रा यांना ३ ऑक्टोबरला बजावलेली नोटीस बेकायदा आणि मनमानी आहे. याचिकाककर्त्यांना तातडीने घर रिक्त करण्याची नोटीस बजावण्याची आवश्यकता नाही. गेली दोन दशके ते घरात सहा सदस्यांसह राहत आहेत. ते त्यांचे निवासस्थान आहे. त्यामुळे ईडीच्या नोटीसला स्थगिती द्यावी, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे. ईडीने २०१८ मध्ये अमित भारद्वाजसह बिटकॉइन फसवणूक आणि मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली तक्रार दाखल केली होती. शेट्टी आणि तिचा पती या दोघांचेही या प्रकरणात आरोपी म्हणून नाव नाही.