सरसकट बंदी घातली तर माध्यमांच्या स्वातंत्र्यावर गदा, उच्च न्यायालयाने शिल्पा शेट्टीला सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2021 06:46 AM2021-07-31T06:46:55+5:302021-07-31T06:47:23+5:30

Shilpa Shetty News: शिल्पा शेट्टी हिच्याविरोधात कोणीही वार्तांकन करू नये, असे आदेश देणे म्हणजे प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्यासारखे आहे, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने शुक्रवारी नोंदवले.

Shilpa Shetty News | सरसकट बंदी घातली तर माध्यमांच्या स्वातंत्र्यावर गदा, उच्च न्यायालयाने शिल्पा शेट्टीला सुनावले

सरसकट बंदी घातली तर माध्यमांच्या स्वातंत्र्यावर गदा, उच्च न्यायालयाने शिल्पा शेट्टीला सुनावले

googlenewsNext

 मुंबई : शिल्पा शेट्टी हिच्याविरोधात कोणीही वार्तांकन करू नये, असे आदेश देणे म्हणजे प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्यासारखे आहे, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने शुक्रवारी नोंदवले.
न्यायमूर्ती गौतम पटेल यांच्या एकलपीठाने यूट्युबवर तीन खासगी व्यक्तींनी त्यांच्या चॅनेलवर अपलोड केलेले तीन व्हिडिओ काढण्यास सांगितले. कारण या व्हिडिओमधील बाबी आणि वास्तविकता यांचा ताळमेळ नसल्याने न्यायालयाने यूट्युबला वरील आदेश दिले. प्रत्येक व्यक्तीचा गोपनीयतेचा अधिकार आणि प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्याचा अधिकार यामध्ये संतुलन ठेवणे आवश्यक आहे, असे न्यायालयाने म्हटले. 
शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा याला पोर्नोग्राफी फिल्म्सप्रकरणी अटक केल्यानंतर या तिन्ही व्हिडिओंमध्ये शिल्पा शेट्टीच्या  नैतिकतेवर आणि तिच्या पालकत्वाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
राज कुंद्रा याला १९ जुलै रोजी अटक केल्यानंतर शिल्पा शेट्टी व तिच्या कुटुंबीयांची मानहानी करणारे अनेक लेख प्रसिद्ध करण्यात आले. संबंधित मीडिया हाऊसच्याविरोधात तिने मानहानी दावा केला आहे. प्रसारमाध्यमांना कोणत्याही प्रकारचा बदनामीकारक, अयोग्य वार्तांकन करण्यापासून प्रतिबंध करावा, अशी अंतरिम मागणी शिल्पाने दाव्यात केली आहे.
दावेदाराच्या मागणीमुळे प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यावर गदा येईल. चांगले किंवा वाईट वार्तांकनाबाबत न्यायालयीन मर्यादा आहेत. कारण त्याचा परिणाम माध्यमांच्या स्वातंत्र्यावर येईल, असे न्यायमूर्ती पटेल यांनी म्हटले.
शिल्पा शेट्टी यांनी दाखल केलेल्या दाव्याचा अर्थ वेगळा निघतो. आमच्याबाबत चांगले बोलणार नसाल तर काहीच बोलू नका, असे माध्यमांना सांगण्यासारखे आहे. असे कसे सांगता येईल? असे न्यायालयाने म्हटले.
या दाव्यामध्ये जे लेख जोडले आहेत, त्यात असे नमूद करण्यात आले आहे की, पोलिसांनी चौकशीसाठी कुंद्राला घरी आणले तेव्हा शिल्पा शेट्टी त्याच्याशी भांडली आणि रडली आणि ही माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून वार्तांकन करणे, हे मानहानीकारक कसे? जर कोणीही उपस्थित नसताना हे केवळ चार भिंतीतच घडले असते तर निराळी बाब होती. पण हे बाहेरच्या लोकांच्या उपस्थितीत घडले. दावेदारही एक मनुष्य आहे, हेच यातून दिसते आणि त्यात काही चुकीचे नाही, असे पटेल यांनी म्हटले.
तुम्ही सार्वजनिक आयुष्य निवडले त्यामुळे हे सर्व त्या प्रांतात येते. तुमचे आयुष्य मायक्रोस्कोपखाली येतच राहणार, असेही न्यायमूर्ती पटेल यांनी म्हटले.
शिल्पा शेट्टी हिने गुगल, यू ट्युब, फेसबुकवर तिची व तिच्या कुटुंबाची मानहानी करणारा सर्व मजकूर व व्हिडीओ डिलीट करण्याची मागणीही केली आहे.
या सर्व समाजमाध्यमांना संपादकीय मजकुरावर नियंत्रण ठेवण्यास सांगणे, हे धोक्याचे आहे, असेही न्यायमूर्ती पटेल यांनी स्पष्ट केले.
न्यायालयाने सर्व प्रतिवाद्यांना शिल्पा शेट्टी हिच्या दाव्यावर उत्तर दाखल करण्याचे निर्देश देत यावरील पुढील सुनावणी २० सप्टेंबर रोजी ठेवली.

Web Title: Shilpa Shetty News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.