लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : तब्बल ६६०० कोटी रुपये मूल्याच्या बिटकॉईन घोटाळा प्रकरणात अभिनेत्री शिल्पा शेट्टी व तिचा नवरा राज कुंद्रा यांची ९७ कोटी ७९ लाख रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये जुहू येथे शिल्पा शेट्टी हिच्या नावे असलेला फ्लॅट, पुणे येथील बंगला आणि राज कुंद्रा याच्या नावे असलेले शेअर्स यांचा समावेश आहे. बिटकॉईन घोटाळ्यामधून कमावलेल्या पैशांतून कुंद्रा याने ही मालमत्ता खरेदी केल्याचा दावा ईडीने केला आहे.
कुंद्राला मिळाले होते १५० कोटींचे बिटकॉईन - या बिटकॉईनच्या व्यवहारांसाठी कुंद्रा याने भारद्वाज याच्या कंपनीला युक्रेनमध्ये संगणकीय व्यवस्था उपलब्ध करून दिली होती. याकरिता कुंद्रा याला २८५ बिटकॉईन मिळाले होते. या बिटकॉईनची किंमत १५० कोटी रुपये इतकी आहे. - या गुंतवणूक योजनेत घोटाळा झाल्याप्रकरणी महाराष्ट्र व दिल्ली पोलिसांत तक्रार दाखल झाली होती. याप्रकरणी गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात ईडीच्या अधिकाऱ्यांनी भारद्वाज कुटुंबीयांशी निगडित मालमत्तांवर छापेमारी करत ६९ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.