मुंबई : हॉलिवूड स्टार रिचर्ड गेरेने २००७ मध्ये एक सार्वजनिक कार्यक्रमात अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्या गालावर चुंबन घेतल्याप्रकरणी तिच्यावर दाखल केलेल्या प्रकरणातून न्यायालयाने तिची आरोपमुक्तता केली. ती गेरेच्या कृत्याला बळी पडली, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
महानगर दंडाधिकारी न्यायालयाने १८ जानेवारी रोजी शिल्पा शेट्टीची आरोपमुक्तता केली. मात्र, सोमवारी निकालाची प्रत उपलब्ध झाली. २००७ मध्ये गेरे आणि शेट्टी हे एक जनजागृती करणाऱ्या कार्यक्रमात सहभागी झाले. तेव्हा गेरेने शिल्पाच्या गालावर चुंबन घेतले. याबाबत अनेकांनी शिल्पावर टीका केली व गुन्हाही नोंदविला. ‘आरोपी शिल्पा शेट्टी ही आरोपी क्रमांक १च्या (रिचर्ड गेरे) कृत्याची बळी पडली, असे दिसते. कथित गुन्ह्याबाबत केलेल्या तक्रारीत एकही घटक न्यायालयाचे समाधान करणारा नाही,’ असे न्यायालयाने म्हटले.