शिल्पा शेट्टीच्या आईची जमीन व्यवहारात फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:06 AM2021-07-30T04:06:49+5:302021-07-30T04:06:49+5:30
जुहू पोलिसांत गुन्हा दाखल; १ कोटी ६० लाखांचा चुना लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : जमीन व्यवहार प्रकरणात फसवणूक झाल्याची ...
जुहू पोलिसांत गुन्हा दाखल; १ कोटी ६० लाखांचा चुना
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : जमीन व्यवहार प्रकरणात फसवणूक झाल्याची तक्रार अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिची आई सुनंदा यांनी बुधवारी जुहू पोलिसांत दाखल केली आहे. कोर्टाच्या आदेशानुसार याप्रकरणी जुहू पोलिसांनी गुन्हा दाखल करत चौकशी सुरू केल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.
सुनंदा शेट्टी यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, मे २०१९ ते फेब्रुवारी २०२० या दरम्यान रायगडच्या कर्जत परिसरात चार हेक्टर जमिनीबाबत सुधाकर घारे यांच्यासोबत त्यांनी व्यवहार केला होता. मात्र काही काळानंतर सुनंदा यांना जमिनीची कागदपत्रे बोगस असल्याचे समजले. मात्र जमिनीसाठी त्यांनी घारे याला १ कोटी ६० लाख रुपये दिले होते, त्यामुळे त्यांनी ते परत मागितले. मात्र घारे याने ते परत देण्यास नकार दिला आणि त्यांना खोट्या केसमध्ये अडकवण्याची धमकी दिली. सुनंदा यांनी याप्रकरणी अंधेरी कोर्टाचा दरवाजा ठोठावला. त्यानुसार कोर्टाने बुधवारी याप्रकरणी जुहू पोलिसांना याप्रकरणी गुन्हा दाखल करत चौकशी करण्यास सांगितले. कोर्टाच्या आदेशानुसार बुधवारी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असल्याचे जुहू पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशीकांत माने यांनी सांगितले.
अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार : सुधाकर घारे
कर्जत : ‘मी शिल्पा शेट्टीच्या मातोश्री सुनंदा शेट्टी यांची जमीन व्यवहार प्रकरणी फसवणूक केली नसून उलट त्यांनीच करारानुसार ४५ दिवसांत होणारा व्यवहार अद्याप पूर्ण न करता उलट माझ्यावरच फसवणुकीची तक्रार केली आहे. तसेच त्यांनी प्रसार माध्यमात माझी नाहक बदनामी सुरू केली आहे. त्यामुळे मी सुनंदा शेट्टी यांच्यावर लवकरच अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार आहे’, असा इशारा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी दिला आहे.
कर्जत तालुक्यातील एका शेतघरासह जमीन विकत घेण्याचा व्यवहार अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांच्या आई सुनंदा शेट्टी यांनी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुधाकर घारे यांच्याशी केला होता. हा व्यवहार मुदतीत पूर्ण न करता प्रत्येक वेळी तारीख पे तारीख देत तो आजपर्यंत लांबवत नेला आणि उलट घारे यांचीच तक्रार पोलीस ठाण्यात केली. प्रसार माध्यमांमधून या प्रकरणावर भाष्य करण्यात आले होते. या प्रकारामुळे बदनामी होत असल्याने घारे यांनी त्यांच्या आमराईमधील कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला आहे. यावेळी माजी नगराध्यक्ष शरद लाड देखील उपस्थित होते.