मुंबई: भाभी जी घर पर है मालिकेत अंगुरी भाभीची व्यक्तीरेखा साकारणाऱ्या अभिनेत्री शिल्पा शिंदेनंराजकारणात पाऊल टाकलं आहे. बिग बॉस-11 ची विजेती शिल्पा शिंदेकाँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांच्या उपस्थितीत शिल्पा शिंदे पक्षप्रवेश करणार आहे. काँग्रेसनं या वृत्ताला दुजोरा दिला आहे. भाभी जी घर पर है ही मालिका अतिशय लोकप्रिय झाली होती. या मालिकेनं शिल्पाला नवी ओळख मिळवून दिली. या मालिकेमुळे तिचा मोठा चाहता वर्ग तयार झाला. याच गोष्टी लक्षात घेऊन काँग्रेसनं शिल्पाला पक्षात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे तिला निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाणार का, याबद्दल उत्सुकता आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री इशा कोप्पीकरनं राजकारणात पाऊल टाकलं. तिनं भाजपामध्ये प्रवेश केला. शिल्पा शिंदेनं 1999 मध्ये छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. मात्र 2015 मध्ये आलेल्या भाभी जी घर पर है या मालिकेनं शिल्पाला मोठी प्रसिद्धी मिळवून दिली. यामध्ये तिनं अंगुरी भाभीची व्यक्तीरेखा साकारली होती. शिल्पानं 2016 च्या सुरुवातीला मालिकेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. ऑक्टोबर 2017 मध्ये तिनं बिग बॉस 11 मध्ये सहभाग घेतला. तिनं हा रिअॅलिटी शो जिंकला होता.शिल्पा शिंदेचा जन्म 28 ऑगस्ट 1977 रोजी महाराष्ट्रातल्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. शिल्पाचे वडील डॉ. सत्यदेव शिंदे उच्च न्यायालयात न्यायमूर्ती होते. तर तिची आई गीता शिंदे या गृहिणी आहेत. शिल्पाला दोन मोठ्या बहिणी आणि एक लहान भाऊ आहे. शिल्पानं के. सी. कॉलेजमधून मानसशास्त्राचं शिक्षण घेतलं. मात्र पदवीपर्यतचं शिक्षण पूर्ण करण्यात तिला अपयश आलं. शिल्पानं कायद्याचा अभ्यास करावा, अशी तिच्या वडिलांची इच्छा होती. मात्र शिल्पाला त्यात फारसा रस नव्हता.
काँग्रेसला अंगुरी भाभीची साथ; बिग बॉस विजेती शिल्पा शिंदे राजकारणात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2019 2:34 PM