Join us

प्राचीन संस्कृतीचे महत्त्व सांगणारे ‘शिल्पग्राम’ ठरतेय लोकप्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 4:06 AM

मुंबई : धावपळीच्या जीवनात दोन क्षण विरंगुळ्याचे मिळवून देणाऱ्या जोगेश्वरी (पूर्व) येथील शिल्पग्राम उद्यानात प्राचीन संस्कृतीचे दर्शनही घडविण्यात येत ...

मुंबई : धावपळीच्या जीवनात दोन क्षण विरंगुळ्याचे मिळवून देणाऱ्या जोगेश्वरी (पूर्व) येथील शिल्पग्राम उद्यानात प्राचीन संस्कृतीचे दर्शनही घडविण्यात येत आहे. बारा बलुतेदार कार्यपद्धती, प्राचीन खेळ, कला, शिल्पं, खुला रंगमंच, संगीत कारंजे अशी विविधांगी सांस्कृतिक माहिती देणारे हरित केंद्र ठरलेले शिल्पग्राम नागरिकांच्या पसंतीला उतरले आहे.

जोगेश्वरी (पूर्व) येथे जोगेश्वरी - विक्रोळी जोडमार्गावर पूनम नगर परिसरात तब्बल ५५ हजार चौरस मीटर क्षेत्रावर ‘मातोश्री मीनाताई ठाकरे शिल्पग्राम’ हे उद्यान फुलले आहे. हे केवळ उद्यान नसून, सांस्कृतिक वारसा उलगडून दाखवणारे हरित केंद्र आहे. याठिकाणी बारा बलुतेदार, प्राचीन खेळ, नृत्य यांची शिल्पं आहेत.

राज्याच्या व देशाच्या प्राचीन संस्कृतीचे दर्शन घडविणारी बारा बलुतेदार यांची घरे, त्यांच्या कामाचे स्वरूप, प्राचीन खेळ व नृत्य परंपरा यांची शिल्पं पाहताना मुले आणि वडीलधारेदेखील हरखून जातात. इतिहासातील माहिती शिल्प रूपामध्ये पाहून मुलांना सांस्कृतिक आकलन करणे सहज सोपे होते.

खुला रंगमंच, संगीत - नृत्य...

शिल्पग्राममध्ये खुला रंगमंच (एम्फीथिएटर) देखील तयार करण्यात आला आहे. संगीत, नृत्य, मुक्त संवाद, चर्चासत्र, सभा अशा विविध कार्यक्रमांसाठी किमान पाचशे व्यक्ती बसू शकतील, इतक्या क्षमतेचा हा खुला रंगमंच आहे. या उद्यानात हिरवळीसोबत विविध प्रजातींचे वृक्ष, वेली, झुडपे ठिकठिकाणी असल्याने उद्यानाच्या सौंदर्यात भर पडत आहे. तसेच संगीतमय कारंजे आणि सांगीतिक पदपथ हे महत्त्वाचे आकर्षण ठरत आहे.

* शिल्पग्राम उद्यान स. ६ ते १० आणि दु. ४ ते रात्री ८ यावेळेत नागरिकांकरिता खुले असते. दर बुधवारी नियमित परिरक्षणाकरिता ते बंद असते.

* हे उद्यान पाहण्याकरिता ३ ते १२ वर्षे ह्या वयोगटातील लहान मुलांकरिता प्रत्येकी पाच रुपये आणि १२ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्तीसाठी प्रत्येकी २५ रुपये प्रवेश शुल्क आकारले जाते.

* दोन प्रौढ आणि दोन लहान मुले अशा चौघांच्या एका कुटुंबासाठी (आई, वडील व १२ वर्षांखालील दोन मुले) यांना मिळून फक्त २५ रुपये आकारण्यात येतात.

* शिल्पग्रामला दररोज सुमारे दीड ते दोन हजार नागरिक भेट देतात.